fbpx

संपादकीय

प्रिय वाचक,

सस्नेह नमस्कार,

आज दसऱ्यापासून आम्ही सांग सखी परिवार आपल्या भेटीला येत आहोत. या वेबपोर्टलच्या माध्यमातून सतत काहीतरी वेगळं आणि दर्जेदार देण्याचा प्रयत्न आम्ही व्हर्च्युअल टेक्नॉलॉजिच्या माध्यमातून करणार आहोत.

मनाशी एक विशिष्ट ध्येय बाळगून काही वेगळं करू इच्छिणाऱ्या आमच्या संपूर्ण  टीमच्या मागे आपण मोठ्या संख्येने उभे राहिलात तर हि बाब  भविष्यात आमच्याशी प्रेरणादायी ठरणार आहे.

सांग सखी समोर अगदी सुरुवातीपासूनच नव्या योजना, नव्या कल्पना आणि नव-नवीन विषयांना प्राधान्य देण्याचा विचार आहे.याच स्वरूप आणखी व्यापक आणि सर्वमावेशक करण्यासाठी तसेच वेबपोर्टलचा आगळा-वेगळा चेहरा मोहरा समोर येण्यासाठी तुमचेही सहकार्य अपेक्षित आहे.

पंडिता रमाबाईच्या ‘शारदा सदन’ मध्ये बालविधवा आनंदीबाई कर्वे या राहत होत्या तेव्हाची  त्यांनी सांगितलेली आठवण ‘माझे पूराण’ यामध्ये लिहिताना त्या म्हणतात, “स्त्री हाच स्त्रीचा शत्रू आहे. स्त्रियांचा उद्धार करायला स्त्रियांनीच पुढे झाले पाहिजे शिकलेल्या स्त्रीने आयुष्यात एख्याद्या तरी विधवेला शिकवले पाहिजे मी तसा प्रयत्न प्रामाणिकपणे केला,  त्यामुळे त्यांची शिकवण म्हणजे संवेदनेचा पाट बांधून तो झिरपत झिरपत खालपर्यंत नेण्याची दृष्टी मला लाभली आहे.” हि गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धारातील ! आताच्या संगणक आणि तंत्रज्ञान युगाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर विधायक कामासाठी अधिक होणार असल्याने शुभारंभाचे पहिले पाऊल टाकताना ‘शिकायला तर मिळेलच शिवाय एक जीवनदृष्टी मिळेल’ हे अपेक्षित असल्याने  खूप आनंद होत आहे.

तिच्यासाठी व्यक्त होणारी ती म्हणजे ‘सखी’…तिच्या सुख-दुःखाच्या भावभावनांना आपलेपणाने साद घालणारी म्हणजे सखी……’सखी’ ही एक कोणी विशिष्ट व्यक्ती नाही…ती कोणीही असू शकते …प्रत्येकीची सखी वेगळी असेल, कधी ती मैत्रिणीच्या, कधी आईच्या, कधी आजीच्या, कधी बहिणीच्या कधी मावशीच्या रूपातही असेल. पण या वेबपोर्टलसाठी व्यक्त होणारी ती मात्र….

रुपाची मोहिनी

पराक्रमाची दामिनी

सौंदर्याची लावणी

शौयाची रागिणी

मायेची माउली

दयेची सावली

अशी तू या विश्वाची शक्ती, नसे तुज दुसरी उक्ती…..!

ती अश्या रूपात वेळोवेळी प्रकट होणारी असावी. आणि त्या त्या सखींमध्ये तिच्या तिच्या प्रतिभेचे वलय असावे. या सखीच्या लेखनाच्या आणि वाचनाच्या माध्यमातून व्यक्त कल्पनेची भरारी उत्तुंग असावी. कारण तिच्या शब्दात मंत्राचे सामर्थ्य आहे. या मंत्राने ती अग्नी फुलवूही शकते व विझवूही शकते. त्या मंत्राचा ती कसा उपयोग करते, यावर समाजाचे अस्तित्व अवलंबून आहे.

स्त्री ही जशी प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती , सहनशील, सौदंर्यह्याची खाण असते, तसेच ती कणखर बाण्याची, वेळप्रसंगी कर्तव्यकठोर, भावनांना मुरड घालून सोशिकतेचा परमोच्च बिंदू गाठून , त्यागाची परिसीमा गाठणारी, अतुलनीय शौर्यालाही सहजतेने लीलया गाठणारी असते. स्त्रीला हे सारे अमाप गुणांचे  वरदान तिच्या मातेकडून अर्थातच जगज्जननी आदिमातेकडूनच मिळाले असते. कोणी तिला रणरागिणी चण्डिका, अशुभनाशिनी महिषासुरमर्दिनी म्हणून साद घालते, तर कोणी दुर्गतीपासून रोखणारी दुर्गा म्हणते तर कोणी पातिव्रत्याचा आदर्श आणि मातृवात्सल्य भावाची सगुण साकारस्वरूपिणी अनसूयामाता म्हणून स्मरते तर कोणी अंबा जगदंबा, भवानी , महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आदी नावांनी पूजते.

आज मुली मोठ्या संख्येने शिकत आहेत. नोकऱ्या आणि करिअर करताहेत. हे चित्र निश्चितच उजवं आणि उजळ आहे. ही संधी ज्यांना मिळाली, ज्यांनी घेतली त्यांना अर्थातच नवी वाट सापडल्याचा आनंद असणार. अलीकडे स्वतःला आवडेल ते शिक्षण घेणं, मोठ्या हुद्द्यावर मिळेल त्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीसाठी जाणं, स्वतंत्रपणे आवडेल तो व्यवसाय करणं, आणि स्वतःच समाजात विशिष्ट स्थान निर्माण करणं हि एक पिढीचं निर्माण झाली आहे. अशाच स्त्रियांना आपण करिअरिस्ट स्त्री किंवा स्वतंत्र प्रगतीची आकांक्षा बाळगणारी स्त्री म्हणतो. आकांक्षिणी म्हणतो. हे प्रमाण हळूहळू वाढत आहे. हे सगळं तस छान छान वाटत असतानाच दुसरही एक गडद वास्तव आपल्याला विसरता येण्यासारखं नाही. मुली शिकल्यासवरल्या, मिळवत्या, करिअरवाल्या झाल्या तरी त्या स्वस्थ, सुरक्षित जीवन जगू शकतात ? धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी, तिच्या उन्नतीसाठी जी धडपड केली, त्याचे आज चीज झाले असे म्हणायला हरकत नाही.

या साऱ्यांतून विचाराच्या आधारानं ती खंबीर होत आहे, काहीजणी चौकटी, उंबरे, भिंती ओलांडून जाण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांच्या हिमतीच कौतुक करावं तेवढं थोडच आहे. पण ही हिमंत अनेकदा खूप  मोठी किंमत मागते. कधी कधी थोड्या संघर्षावर भागत, तरी  कधी जीवावरही बेतते तिच्या !

जन्माला येण्यापूर्वीच आईच्या गर्भाशयात असल्यापासूनच ‘ति’ची लढाई चालू होते. पुढे (जन्म मिळालाच तर) बंधनाचे ओझे वागवत ‘ती’ मोठी होते. मग लग्नाचे बंधन, आणि त्यानंतर  संसाराच्या रणांगणावर विविध भूमिकेत लढणारी ‘ती’ रणरागिणी आयुष्यभर लढत राहते…न थकता..अविरतपणे. आज ‘ति’ ची लढाई फक्त घरापुरतीच मर्यादित नाहीय. ‘ती’ आज कमावती झालीय. उच्च पदांवर पोहोचलीय. पण अमानवी चेहऱ्याच्या सापळ्यात ‘ती’ आजही हतबलच आहे. बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांच्या जोरावर ‘ती’ ने स्वतःची वाट तर निर्माण केली पण त्या वाटेचा वाटेकरी ‘त्या’ नेही व्हावं ही ‘ती’ ची सुप्त इच्छा अजूनही अपुरीच आहे…

प्रत्येक स्त्री  हि प्रथम माणूस असते आणि कदाचित खरंच असावं. किती मुक्तहस्ताने उधळण करते स्त्री आपल्या मायेची, वात्सल्याची, प्रेमाची आणि किती आयुष्य समृद्ध करते, समोरच्याला साधी जाणीवही होऊ न देता, पण तांत्रिक आणि जागतिकीकरणाच्या झपाट्यात स्त्रीच्या वेगाने होणाऱ्या वास्तुकारणाचे प्रश्न स्त्री भ्रूणहत्या, लिव्ह इन रिलेशिप, बदललेली नैतिकता, एकट्या राहणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न, आयटी, कालसेंटरमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न असे नव्या काळाचे आधुनिक प्रश्नही तिला घेरुन टाकत आहेत, अशी मोठी रेंज असणाऱ्या प्रश्नांच्या भोवऱ्यात आजची स्त्री सापडली आहे. हे सारे प्रश्न कधी थेटपणे आपल्या किंवा आपल्या आसपासच्या माणसांच्या दारापर्यंत येऊन भिडताहेत तर कधी साक्षीभावाने या प्रश्नांची तीव्रता आपल्या जाणिवांचा तोल ढवळून काढत आहेत. वेळोवेळी या प्रश्नाविषयी जो संताप, चीड व्यक्त करून, दुःख आणि आस्था वाटली तर त्याला वाट करून देण्याचा प्रयत्न या सांग सखीच्या माध्यमातून व्हावा.

म्हणजे हे  स्वतःबद्दल…स्त्रीतत्त्वाबद्दल,स्वतःच्या अस्तित्वाबद्दल…जगण्याबद्दल मुक्तपणे व्यक्त होण्याचे हे ठिकाण असणार आहे. ती’चं जग एकसंध असे कधीच नव्हते. पूर्वी ते शहरातली – खेडय़ातली, नोकरी करणारी आणि न करणारी अशा वेगवेगळ्या बेटांवर विभागलेले होते. आता तर व्हर्चुअल जगात वावर असणाऱ्या हायटेक असे एक आणि इंटरनेटच काय पण संगणकही वापरू न शकणाऱ्या, मग ते आर्थिक वा शैक्षणिक अभावापोटी वाट्याला आलेले ‘तिचे’जग इतके वेगवेगळ्या स्तरांवर आहे की जणू दोन वेगवेगळ्याच वसाहती. जगभरातल्या कानाकोपऱ्यात नोकरी-व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने विखुरलेल्या मराठी जनांमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने आहे आणि रोज त्यांच्या पाऊलखुणा अनेक संकेतस्थळांवर उमटत असतात. इंटरनेटवर रोज कामाच्या निमित्ताने, चर्चा, मतांची देवाणघेवाण किंवा नुसत्याच गप्पा मारण्यासाठी जमणाऱ्या स्त्रियांचे स्वतंत्र असे जग तयार झालेले आहे. त्यात झपाट्याने वाढ होते आहे. मात्र क्वचितच या उच्चशिक्षित स्त्रियांच्या ऊर्जेचा, ज्ञानाचा, अनुभवांचा एकत्रित असा ओघ काही विधायक कार्याकडे वळवला जातो. तसे करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणाऱ्या स्त्रियाही मोजक्याच असतात.

समाजमनाची जडणघडण ही नवनवीन कल्पना,विचार यांच्या सकारात्मक देवाणघेवाणीतूनच होत असते. म्हणूनच ‘सांग सखी’ या नावाचं हे व्यासपीठ मैत्रीपूर्ण संवादासाठीच आम्ही उभं करीत आहोत. जरी हे इ-पाक्षिक डिजिटल स्वरूपात आधुनिक तंत्रज्ञाच्या माध्यमातून संगणकावर पाहता येणार असले तरी ते ‘आपलं’ म्हणून आपल्या हृदयातही त्याला स्थान मिळावं हेच आमचं ध्येय आहे. केवळ मनोरंजनच नव्हे; तर आपल्याला प्रेरणादायक काहीतरी देण्याचा, केवळ चविष्ट नव्हे, तर पौष्टीक असं काहीतरी देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सदैव राहील. संवादासाठी ‘शब्द’ हे एक माध्यम आहे, हे किती छान आहे ! आपल्या भावना व्यक्त करताना अनेकदा शब्दच मदतीला धावून येतात. ढोबळमनाने विचार केला तर हे खर आहे. पण एव्हढ्या अगणित भावछटा प्रत्येकालाच शब्दांकित करता येतात असही नाही. मग अशा अव्यक्त भावना दुसऱ्या कुणाकडून तरी व्यक्त झाल्या, बोलण्यातून, कवितेतून, चित्रातून, लेखातून,चित्रपटातून कि त्या आपल्याला आवडतात.

इंटरनेटवरच्या संकेतस्थळांच्या माध्यमातून आजच्या युगातल्या अतिप्रगत आणि बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून घेणाऱ्या स्त्रियांनी आणि या संकेत स्थळाला भेट देणाऱ्यांनी जर मनावर घेतले तर ऑनलाईन व्हर्चुअल जगात सहज वावरू शकणाऱ्या तिच्या आणि तिच्यासारख्या शैक्षणिक, आर्थिक स्थैर्य न लाभू शकलेल्या हजारो ऑफलाइन असलेल्या स्त्रियांच्या जगातले अंतर नक्कीच कमी होईल आणि बघता बघता दोन्ही जगातले तिचे अंगण आणि घरटे जास्तीत जास्त सक्षम आणि सुंदर बनून जाईल यात शंकाच नाही.संवादासाठी ‘शब्द’ हे एक माध्यम आहे, हे किती छान आहे ! आपल्या भावना व्यक्त करताना अनेकदा शब्दच मदतीला धावून येतात. ढोबळमनाने विचार केला तर हे खर आहे. पण एव्हढ्या अगणित भावछटा प्रत्येकालाच शब्दांकित करता येतात असही नाही. मग अशा अव्यक्त भावना दुसऱ्या कुणाकडून तरी व्यक्त झाल्या, बोलण्यातून, कवितेतून, चित्रातून, लेखातून,चित्रपटातून कि त्या आपल्याला आवडतात. त्या की-प्याडच्या साहाय्याने मराठी युनिकोडचा वापर करून आमच्यापर्यंत पाठवा. हे अगणितांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आमचे असणार आहे. उत्तम प्रतिसादाचा अमर्याद ओघ दिवसेंदिवस असाच उत्तरोत्तर वाढत जावा, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्शील राहू. नवे उपक्रम आणि व्यापक व दर्जेदार विषयांवर असणार भाष्य करणार आहोत. आम्हाला तुमचीसाठी साथसोबत मिळेल, याबाबत आम्हाला जराही शंका वाटत नाही.

कोणत्याही जगातल्या असोत, सर्वसाधारणपणे स्त्रियांना रोजच्या नोकरी-व्यवसायाच्या तापामधून वेळ उरलाच तर स्वत:च्या घरटय़ाची आणि समाजमनाची जडणघडण ही नवनवीन कल्पना,विचार यांच्या सकारात्मक देवाणघेवाणीतूनच होत असते. म्हणूनच ‘सांग सखी’ या नावाचं हे व्यासपीठ मैत्रीपूर्ण संवादासाठीच आम्ही उभं करीत आहोत. जरी हे इ-पाक्षिक डिजिटल संकेतस्थळाच्या स्वरूपात आधुनिक तंत्रज्ञाच्या माध्यमातून कॉम्पुटर,मोबईल,लॅपटॉपवर पाहता येणार असले तरी ते ‘आपलं’ म्हणून आपल्या हृदयातही त्याला स्थान मिळावं हेच आमचं ध्येय आहे. केवळ मनोरंजनच नव्हे; तर आपल्याला प्रेरणादायक काहीतरी देण्याचा, केवळ चविष्ट नव्हे, तर पौष्टीक असं काहीतरी देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सदैव राहील.पाककृती-पेहरावापासून पर्यटनापर्यंत, पालकत्वापासून सामाजिक प्रश्नांपर्यंत, मी-टू, राईट टू पी पासून जागतिक स्तरावरील वर्ण-लिंगभेदापर्यंत, कवितेच्या अभिव्यक्तीपासून पुस्तकसमीक्षेपर्यंत, बालपणीच्या आठवणींपासून भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लींच्या चित्रणापर्यंत तिच्या विषयांचं वैविध्य समजून घेण्याचा-देण्याचा प्रयत्न करूया

केवळ मनोरंजनाचं नव्हे तर आपल्याला वैचारिकदृष्टया पुढे घेऊन जाण्यासाठी, एकंदरीतच आपल्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही ‘सांग सखीचा’ घाट घातला आहे, ‘सांग सखी’ हे केवळ वाचनीय न होता ग्राफिकच्या साहाय्याने  प्रेक्षणीय होईल याकडेही आम्ही लक्ष देत जाणार आहोत. त्यामुळे वाचकहो असा संबोधताना आम्ही प्रेक्षकहो असं संबोधलं कधी तर ती कधी चूक ठरू नये. आता दर पंधरा दिवसांनी नवनवीन गोष्टी घेऊन आपण भेटतच राहू सखीच्या नात्याने मैत्र वाढवतच राहू !

जरी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा मागे ठेवून स्त्री पुढे सरकली असली तरीही संस्कृती आणि रीतीरीवाजाच्या सहाय्याने स्त्रीने आता आपली पावले या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी भक्कमपणे रोवली आहेत हे निश्चित ! आजच्या या स्त्रीत्वाला ती’च्या सर्वोत्तम स्थान पटकावण्याच्या आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये हातभार लावण्याच्या आजवरच्या अभूतपूर्व कामासाठी सांग सखी मनापासून वंदन करतो. आणि अजून असे अनेक मैलाचे दगड या स्त्रीने असेच पादाक्रांत करावेत यासाठी आज सीमोल्लंघनाच्या दिनी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो आहोत.

रवींद्र मालुसरे

मुख्य संपादक

7 Replies to “संपादकीय”

 1. सांगसखीचं संपादकीय आवडलं. आजच्या समाजातील महिलांच्या गौण स्थितीबद्दल इतक्या संवेदनशीलतेनं आणि प्रगल्भतापूर्वक विचार करून त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण उभारलेली स्त्रीहितवर्धक सुसंस्कृत, सशक्त, सुधारक, मार्गदर्शक “सांग सखी” नावाची ही चळवळ अत्यंत कौतुकास्पद आहे.

 2. खूप छान उपक्रम आहे…मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
  लिखाणाची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

 3. सांगसखीचं संपादकीय आवडलं. आजच्या समाजातील महिलांच्या गौण स्थितीबद्दल इतक्या संवेदनशीलतेनं आणि प्रगल्भतापूर्वक विचार करून त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण उभारलेली स्त्रीहितवर्धक सुसंस्कृत, सशक्त, सुधारक, मार्गदर्शक “सांग सखी” नावाची ही चळवळ अत्यंत कौतुकास्पद आहे.

 4. संपादकीय काळजाला हात घालणारे आहे. सदर वेबसाइट सुरू करून संपादकांनी नव्या व जुन्या लेखकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. – दादासाहेब येंधे, मुंबई (dyendhe@rediffmail.com)

  1. सुप्रभात
   नव्या युगातील नवनव्या माध्यमाद्वारे जनजागरण तसेच समाजप्रबोधन करण्याचा आपला उपक्रम केवळ कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय व स्तूत्य आहे। मन:पूर्वक अभिनंदन।

   1. धन्यवाद ….अशोक सावंत साहेब …आपला वैचारिक आधार हेच आमचे पाठबळ

 5. Dear all Readers.. It’s mind blowing Heart touching lines by editors .. In our very busy life such type of Portal make us happy and cheerfrful with good thoughts and good appeal with nice soft words.. Hats Off to all Team with All the Best . . Thanks a Lot👍🙏👏🌹

Leave a Reply

Your email address will not be published.