fbpx

अंधार दाटला घोर जरी | ज्ञानदीप लावू दारी

अंधार दाटला घोर जरी
ज्ञानदीप लावू दारी

गगन उजळिले नक्षत्रांनी
उजळे धरती आज दिव्यांची

करूया पूजा आज दिव्यांची
तम सारणाऱ्या या तेजाची
येईल लक्ष्मी शुभ पावलांनी

आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अंधारावर मात करत प्रकाश उजळणारा सण म्हणजे दीपावली. फराळाचा आस्वाद, रांगोळीचा सडा, पणत्यांची रांग, नवलाईचा साज आणि आनंदाची उधळण करत येणाऱ्या दिवाळीचा सण प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. भारतातील सर्व धर्मात आढळणारा एक समान गुणधर्म आहे तो म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. अंधाराचा नाश व्हावा आणि घरादाराचा, अंगणाचा, विश्वाचा कोपरान कोपरा उजळून निघावा असे या माणूस म्हणून जन्म घेणाऱ्या प्राण्याला वाटत असावे हे विशेष.  ‘दीप’ हा षोडशोपचार पूजेतील एक उपचार आहे. हा उपचार विविध रूपांनी व्यक्त केला जातो. भगवान विष्णू किंवा श्री विठ्ठल मंदिरात रोज रात्री नित्य नेमाने शेजारती आणि सकाळी काकडआरती म्हणण्याची प्रथा आहे. उत्तर भारतातील कशी, प्रयाग, गया इत्यादी तीर्थक्षेत्री यात्रेकरू संध्याकाळी गंगेच्या घाटावर जाऊन एका द्रोणात फुले आणि फुलवात ठेऊन ती वात प्रज्वलित करून तो द्रोण नदीच्या पात्रात सोडतात. हे गंगामाईला उपचार समर्पण असते. दीप हा अग्नीचे व तेजाचे रूप असून,  वैदिक काळात हा अग्नी यज्ञकुंडाच्या माध्यमानेच आपले अस्तित्व टिकवून राहत असे. दीपाच्या रूपाने तो मानवाला प्रकाश देऊ लागला. दीपज्योती हे ज्ञानाचे आणि बुद्धीचे प्रतीक मानलेले आहे.

तमसो मा ज्योतिर्गमयम म्हणजे अंधारातून मला तेजाकडे ने, अशी उपनिषदातील कृषींची प्रार्थना आहे.

त्याचबरोबर धार्मिक कुलाचारातही दिव्याचे माहात्म्य प्रस्थापित झाले आहे. या दीपचे महत्व आणि माहात्म्य कालिका पुराणात पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

त्यात शिव म्हणतो, दीपांमुळे लोकांवर जय मिळवता येतो. दीप हा तेजोमय आहे. तो धर्मार्थ काममोक्षप्रद आहे. म्हणून हे प्रिये दीप प्रज्वलित करावा. दीपदान हे पुण्यप्रद कर्म आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूच्या समोर दिवा लावल्यास तुलादानाची सर्व तीर्थात अवगाहन केल्याची, पुण्यकर्माची फलप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो. नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही अशी धारणा आहे.

दीपलक्ष्मी नावाचा दिव्यांचा हा एक आगळा वेगळा प्रकार आहे. ही दीपलक्ष्मी कधी सिंहावर, कधी हत्तीवर तर कधी एखाद्या पक्ष्यावर आरूढ झालेली असते व तिच्या हाती दिवा असतो. आपल्या मोठमोठ्या देवळातून दीपमाळ नावाचा एक सुंदर जाडजूड खांब त्यावर दिवे ठेवायला जागा असे दगडी बांधकाम हमखास असतोच. कोणत्याची उत्तम कार्याचा प्रारंभ अगदी अगत्याने प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून होतो. तो ह्या कार्याचा दीप म्हणजे पाहुण्यांचा विचार प्रकाश हळूहळू विकसित होऊन सर्वांपर्यंत पोहोचवावा व ह्या कार्यास श्रोत्यांचाही हातभार व सहकार्य लाभावे हाच हेतू असतो.

सासुरवाशिणीने आपल्या माहेरी दीपदान, दीपपूजन करावयाची प्रथा आहे. माहेरून आपल्याला सतत मायेचा, ममतेचा, वात्सल्याचा, प्रेमाचा प्रकाश मिळत राहावा, माहेरी सुख नांदावे हि भावना ह्या प्रथेमागे होती. त्या दीपाच्या तेलवातीचा खर्च ही माहेरवाशीण देत असे. तुपाचा दीप हा प्रदूषण नाशक समाजला जातो. दिव्यातली वात पदमसूत्र, दर्भगर्भसूत्र, वारव या द्रव्यांपासून करावी. असे संकेत असून दीपपात्र लाकडी, लोखंडी, मातीचे किंवा करवंटीचे असावे असे संकेताने मानले जाते.  जमिनीवर दिवा ठेऊ नये कारण भूमातेला दिव्याचा ताप सहन होत नाही, अशी धारणा आहे. तसेच दिव्यासंबंधी काही निषिद्ध गोष्टी सांगितल्या आहेत. देवापुढे लावलेला दिवा चोरून नेणार्यास अंधत्व येते. फुंकर घालून दिवा विझविणारा तिरळा होतो म्हणून असे कृत्य करू नये असे कालिका पुराणात सांगितले आहे. पेटलेला दिवा हातून पडणार याबाबत सतर्क असावे.

दिव्याच्या ज्योतीच्या रंगरूपावरूनही शुभारंभ संकेत आहेत. दिव्याच्या ज्योती रुक्ष असल्या तर धनाचा विनाश होतो. पांढऱ्या असल्या तर अन्नपदार्थांचे दुर्भिक्ष्य जाणवते. फार तांबड्या असल्या तर युद्धप्रसंग निर्माण होते. काळ्या असतील तर मृत्यूचे भय असते.

देवापुढे लावायच्या दिव्यात तेल किंवा तूप याव्यतिरिक्त अन्य कोणतेही ज्वलनद्रव्य वापरू नये असे अग्नीपुराणातील आदिकल्प पुराणात सांगितले आहे. देवघरात जी समई असते, ती देवतासमान आहे म्हणून नित्यनेमाने पुजारंभी व दीपोत्सवाच्यावेळी   तिची पूजा करण्याचा कुळाचार आहे. दीपावलीच्या वेळी आकाशात झेप घेऊन उंच लटकणाऱ्या दिव्याला आकाशदिवा म्हणतात. तो पितरांना प्रकाश देतो अशी एक लोकसमजूत आहे. लग्नकार्यात रोवळीत एक लामणदिवा ठेवतात. त्याला शकुनदिवा म्हणतात. देवपूजेची वेळी किंवा कोणत्याही मंगल कार्यात साक्षी म्हणून एक दिवा अखंडपणे तेवत ठेवलेला असतो त्याला स्थापितदिवा म्हणतात. महादेवाच्या मंदिरात बारमास अष्टोप्रहर अखंड तेवत राहणारा दिवा असतो त्याला नंदादीप म्हणतात. अशा या दीपदर्शनाने जीवनातं मांगल्य निर्माण होऊन मन उजळून जाते.

असे दिव्याचे अन मनुष्याचे जवळचे जाते असते. दिवा मनुष्याच्या आयुष्यातील सुख-दुःख, राग, लोभ, प्रीती, स्वातंत्र्यं अशा आपल्या असंख्य भावनांशी निगडित असतो….परंतु हि दिवाळी साजरी करताना वाचकांना सांग परिवाराला असा संदेश द्यावासा वाटतोय …..या देशातल्या  समता, बंधुता, न्याय या तिरंगी ध्वजातील ज्योती खऱ्या अर्थाने प्रखरतेने पेटून आपला भारत देश जगात बलशाली, शक्तिशाली साम्राज्य म्हणून मिरवत विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणणारा असावा. त्यादृष्टीकोनातून प्रत्येकाने अंधार कधीच पसरू नये यासाठी समतेचा दिवा आणि त्यात माणुसकीचे तेल टाकून एक दिवा लावावा.

भागवतात संत एकनाथ महाराज लिहितात की,

दीपु लाविजे गृहाभीतरी। तोचि प्रकाशे गवाक्षद्वारी।

तेवि मनी प्रकटला श्रीहरी। तोचि इंदियांतरी भजनानंदु।।

इथे प्रपंच व परमार्थ दोन्ही गोष्टी प्रतीत होत असल्या तरी प्रत्येकाने अंतर्मनातच स्वधर्म, सत्कर्म यासह सद्विचारांचा ‘दीप’ लावला तर आपले सारे ‘जीवन व्यवहार’ सुखावह आणि आनंदरूपच होऊन जाईल.

रवींद्र मालुसरे
मुख्य संपादक

2 Replies to “अंधार दाटला घोर जरी | ज्ञानदीप लावू दारी”

Leave a Reply

Your email address will not be published.