fbpx

सर्वसामान्य ग्रामीण, आदिवासी स्त्रियांना सकारात्मक प्रेरणा देणारी अखंड ऊर्जा! रेखा चौधरी

आयुष्यात विशिष्ट लक्ष्य डोळ्यांसमोर ठेऊन  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अविरत प्रयत्न करून ते लक्ष्य साध्य करणे, यासाठी ती व्यक्ती मुंबई -पुणे -दिल्ली  यासारख्या  मोठ्या शहरातील श्रीमंत,सुप्रसिद्ध व सुशिक्षित घराण्यातील व त्यातही पुरुषच असली पाहिजे, असे नाही, तर ती व्यक्ती एक महिलापण तीसुद्धा ग्रामीण भागातली असू शकते. महाराष्ट्रातील, प्रामुख्याने आदिवासी बहुल लोकवस्तीच्या तुलनेने मागास असणार्‍या नंदुरबारमध्ये जन्मलेल्या रेखा चौधरी यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हे उद्योगजगतातील हि भरारी घेऊन दाखवली आहे. आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येक स्त्रीची जशी इच्छा असते, तसेच आपण मर्दानी आणि राजबिंडे देखणे दिसावे, असे प्रत्येक पुरुषालापण वाटत असते रेखा यांनी हेच  क्षेत्र  निवडले  आणि लक्ष्य नुसतेच साध्य केले नाही, तर तिने निवडलेल्या क्षेत्रात यशाचे उत्तुंग शिखर पादाक्रांत केले आहे नंदुरबार जिल्हयातील एका छोटया गावात रेखा चौधरी लहानाच्या मोठया झाल्या.

वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर धुळे जिल्हयात आल्या. गावात स्थायिक झालेल्या रेखाला सासरी आल्यावरही गप्प बसवत नव्हते. जरी प्रारंभीच्या काळात तिच्या उद्योगांना सासरच्या मंडळींचा तितकासा पाठिंबा नव्हता, तरी तिने आपल्या राहत्या घरात विविध छंदवर्ग सुरू केले. अगदी लोणची, पापड, कुरडया बनवण्यापासून गावातील स्त्रियांना एकत्र आणून गरबा नृत्याचे सामूहिक आयोजन करणे इत्यादी वैविध्यपूर्ण उद्योगांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले; नव्हे तर यातूनही वेळ काढून रेखाने धुळे येथे  सौंदर्यसाधिकेचा  एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या कालावधीमध्ये रेखा दोन कन्यांची माता झाली; परंतु तिने आपले लक्ष्य व घरच्या जबाबदार्‍या यांचा उत्कृष्ट समतोल राखला व आपल्या दोन्ही मुलींचे संगोपनही आईच्या मायेने केले. आणि १९८७ मध्ये ब्युटीपार्लरचा एक वर्षाचा कोर्स अडीच महिन्यांत पूर्ण केला आणि एंजल ब्युटीपार्लर नावाचं पहिलं ब्युटीपार्लर सुरू केलं. सुरुवातीला अपॉइंटमेन्ट घेऊन स्त्रिया त्यांच्याकडे यायच्या. शेवटचे ग्राहक सहा वाजेपर्यंत संपवायचे आणि बाईक घेऊन मुलींना शाळेत आणायला जायचे  दिवसभरच्या कामाची धावपळ, सगळे व्याप नवरा, सासुबाईंना सगळं व्यवस्थित पटवून देऊन त्या आपल्या आवडत्या खेळासोबत इतरही अ‍ॅक्टिव्हिटी करायच्या

रेखाने अल्पावधीमध्ये स्वत:त आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणला. ज्ञानपिपासू रेखा शांत बसली नाही. सिरपूर येथे सासरी राहत असतानाच रेखाने सौंदर्य प्रसाधने बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. मात्र घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्याने सातत्य राखता आले नव्हते. स्वत:तील सर्जनशीलतेमुळे नुसते सौंदर्य आणि सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती यावर सीमित न राहता, तिने या दोन्ही गोष्टींना उत्तम प्रकृती राखण्याची जोड दिली. रेखाला आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण मिळावे, असे मनोमन वाटत होते. त्या सिरपूर या छोट्या गावात ते सहजशक्य नव्हते; तसेच तिच्या लक्ष्याबाबतच्या महत्त्वाकांक्षादेखील सिरपूरमध्ये कोंडल्या गेल्या होत्या. त्यात त्यांच्या दोन्ही मुली नीलांबरी व अपर्णा अभ्यासात हुशार होत्या. अखेरीस रेखाने आपले पती अरुण यांना व घरच्यांना पटवून देऊन, मुलींच्या शिक्षणासाठी व आपल्या लक्ष्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सिरपूरवरून नव्या मुंबईमध्ये आपले बिर्‍हाड हलवले.

मुंबईच्या गर्दी, गोंगाटापेक्षा त्यांना नवी मुंबई भावली. मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांचंही इंग्लिश भाषेचं शिक्षण सुरू झालं.मुलींना इंग्लिश माध्यमांमध्ये घातलेलं. त्यांच्या पुस्तकांची मराठीतील कॉपी आणायच्या. त्या एक एक वाक्य इंग्लिशमध्ये वाचायच्या आणि त्या मराठीतून पाठ करायच्या असा त्यांचा अभ्यास चालायचा. आपले राहणीमान बदलता बदलता प्रसंगी तिने संगणकाचे धडे आपल्या मुलींकडून घेतले आणि हे धडे घेता घेता तिने इंटरनेटवर प्रावीण्य मिळवले. तिने स्वीकारलेला व्यवसाय, ज्यामध्ये आधुनिक सौंदर्यशास्त्र, सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन, प्रकृतीची उत्तम निगा, यामध्ये आधुनिक संपर्क प्रणाली अवगत असणे, ही एक मूलभूत गरज आहे. जगात या क्षेत्रात होणारे संशोधन, तंत्रज्ञान तसेच जागतिक सर्व संस्थांशी जनसंपर्क निर्माण होणे, या गोष्टीपण या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी अंतर्भूत आहेत.

त्यांच्यासाठी तो खूप तणावाचा काळ होता. त्या म्हणतात, ‘‘जवळच एका उत्पादन कंपनीचं वितरणाचं काम करायला घेतलं, त्यांची लेक्चर्स इंग्लिशमधून असायची.

शिक्षिका इंग्लिशमध्ये बोलायची आणि मी वहीची पानंच्या पान त्या जे इंग्लिशमध्ये बोलतील ते मराठीत उतरवून काढायचे. असा प्रवास सुरू झाला . पण स्वत:चं अस्तित्व सिद्ध करायचं होतं. मुंबईत ब्युटी वेलनेस क्षेत्रात तुमच्या चालण्या-बोलण्याला फार महत्त्व होतं. सुरुवातीला जमत नव्हतं पण अनुभवातून शिकायचे ठरवले. एकदा मुंबईत नेहरू सेंटरला ‘रेमिल्युअर’ कंपनीचं सेमिनार भरलं होतं.

मुंबईतल्या अनेक ब्युटिशिअन्स, लहान-मोठया पार्लर्सच्या मुली-स्त्रिया सगळ्या होत्या. तिथं रेखाने अर्धवट इंग्लिशमधून स्वतःबद्दल सांगितलं आणि ‘रेमिल्युअर’ कंपनीचं अख्ख्या भारतासाठीचं वितरण मिळवलं आणि तोच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.’’ एका इंटरनॅशनल ब्रँडसाठी सा-या मुंबईत बाईकवरून फिरून तिने  मार्केटिंगही केले  आणि आत्मविश्वास दुणावला. मुंबईत जिंकलीस तर जगात जिंकशील हा वडिलांनी दिलेला मंत्र त्यांना धडपडायला सतत प्रेरणा देत होता.

हळूहळू तीचा आत्मविश्वास वाढला.’’ त्यानंतर एका मागोमाग एक परदेशी ब्रॅड्स तिच्या खात्यावर जमा होऊ लागले. त्या कामाबद्दल त्या सांगतात, ‘‘जेव्हा एखादा ब्रॅण्ड आमच्याकडे येतो तेव्हा त्या कंपनीकडे भारतातील बाजारपेठेचं सव्‍‌र्हेक्षण असतं आणि त्यावरून त्यांचं उत्पादन विकलं जाईल का, त्याचा खप किती असेल याचे काही निष्कर्ष त्यांनी बांधलेले असतात”.उत्पादन आमच्याकडे आल्यावर आम्ही ते नुसते विकत नाही तर त्याबरोबर सेवादेखील देतो. एखाद्या सलोन किंवा स्पा सेंटरमध्ये हे उत्पादन वापरायचं कसं, त्याबाबत तिथल्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देतो, थोडक्यात आम्ही उत्पादन नाही एक थीम विकतो.

एखादं उत्पादन बाजारात उतरण्यापासून ते स्थिरस्थावर होईपर्यंतची जबाबदारी आम्ही घेतो. मात्र कोणताही व्यवहार करण्याआधी संबंधित कंपनीच्या उत्पादनाचा तांत्रिक दर्जा आम्ही तपासतो. उत्पादन बनवताना त्यांनी वापरलेले घटक, त्यामुळे भारतीय लोकांच्या त्वचेवर होणारे परिणाम आणि अर्थातच त्या कंपनीचा इतिहास आणि कामाची पद्धत आदी सगळं आमच्या मनासारखं असेल तरच आम्ही पुढे जातो.’’

सध्या वीसपेक्षा जास्त विदेशी ब्रॅण्डना स्पा व्यवस्थापनाचे धडेही त्या देतात. देशातील बहुतेक सर्व मोठया पंचतारांकित हॉटेल्समधील, मोठया मॉल्समधील स्पा सेवांचे व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. याशिवाय वेलनेस उद्योगातील प्रशिक्षण देणारी संस्थाही त्यांनी स्थापन केली आहे.

त्यामार्फत स्पा आणि वेलनेस क्षेत्रात येऊ इच्छिणा-या तरुणांना त्या मार्गदर्शन करीत असतात. त्याच दरम्यान ‘ब्युटीक’च्या मायाताई परांजपे यांच्याशी भेट झाली. त्यांच्याच सांगण्यावरून ब्युटीशिअनसाठी आवश्यक ‘सिडेस्को’ परीक्षा दिली.

एकीकडे फेस मसाज, बॉडी मसाज यामधले प्रयोग चालू होते. तेव्हा ‘स्पा’ ही संकल्पना नवीन होती, फक्त काही बडया हॉटेल्समध्ये ‘स्पा’ची सेवा पुरवली जायची. पण हे सगळं आपल्याकडेही आहेच. परदेशातून आलेलं तेच चांगलं, ही संकल्पना आता बदलली पाहिजे. या सगळयांचा अभ्यास करून त्यांनी ‘नोव्हेलरोप मसाज’, ‘जीईओ-थर्मो मसाज आणि ‘हॅड अँड फूट स्पा’ या स्पासाठीच्या ट्रीटमेंट तयार केल्या आणि त्याचं पेटंट घेतलं.

आपलं ज्ञान, आपलं संशोधन आपल्याकडेचं राहिलं पाहिजे हाच यामागचा हेतू आहे. त्याचसाठी ‘करेसा’ ही स्पा चेन सुरू केली. फ्रेंच भाषेत करेसाचा अर्थ होतो ‘प्रेमळ स्पर्श’. ‘करेसा’च्या भारतात सहा शाखा आहेतच. शिवाय आणखी चार भारतातच, तर दोन परदेशात सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.आजच्या धकाधकीच्या दिवसांत माणूस स्वत:ची ऊर्जा, चैतन्य हरवून बसला आहे. ‘स्पा डेस्टिनेशन’ ही अशी जागा आहे, जिथं शरीराला ही ऊर्जा पुन्हा मिळवून दिली जाते. स्वत:च्या स्पा उघडण्याबरोबर रेखाताई इतरांना एखाद्या स्पाची रचना, त्यांची बांधणी, उत्पादन संकल्पना, तेथील कर्मचा-याचं प्रशिक्षण तसेच स्पाची उपकरणं कशी वापरायची या सगळ्यांची माहिती करून देतात.

रेखाताईच्या संकल्पनेतून आकार घेणारं जगातलं सर्वात मोठं स्पा डेस्टिनेशन रशियात तयार होतंय. स्पा वेलनेसच्या क्षेत्रात नवनवीत तंत्रज्ञान येतच असतं आणि त्यासाठी दरवर्षी ‘ग्लोबल स्पा अ‍ॅण्ड वेलनेस समीट’ भरते. वेलनेस आणि स्पा हे वाढतं सेवा क्षेत्र आहे. १८ ते २० टक्के या दराने हे क्षेत्र विस्तारतंय. या सेवा क्षेत्रातली मोठी अडचण म्हणजे प्रशिक्षित मनुष्यबळ. स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचा या इंडस्ट्रीला चांगला पाठिंबा मिळतोय. स्पा क्षेत्राचं रीतसर शिक्षण देणा-या संस्था सुरू होताहेत. या क्षेत्रांतही आता स्कॉलरशिप मिळू शकतात. २०१० मध्ये तुर्कस्थानात भरलेल्या या परिषदेत आमंत्रण मिळालेल्या रेखा चौधरी या पहिल्या भारतीय व्यक्ती होत्या. त्यांच्या नोव्हेल रोप मसाजला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह स्पा ट्रीटमेंट २०१० ‘एशियन स्पा’ पुरस्कार मिळालाय. तसेच ‘महाराष्ट्र उद्योगिनी’ अशा अनेक या पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलंय.

– शैलेश संतोष इटले

Leave a Reply

Your email address will not be published.