fbpx

फटाके हेच काही दिवाळी साजरे करायचे साधन नव्हे –रेश्मा नाईक

फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साईड आदी घातक आहेत याबद्दल दुमत नाही आणि दिवाळीच्या वेळी जेव्हा लक्षावधी लोक फटाके फोडतात, तेव्हा त्या थंड वातावरणात खाली साचून राहणाऱ्या  धुरामुळे कित्येकांना – विशेषतः मुलांना श्वसनाचा त्रास होतो हेही खरे आहे. प्रति घनमीटर पीएम २.५ प्रकारचे ६० मायक्रोग्रॅम आणि पीएम १० प्रकारचे १०० मायक्रोग्रॅमपर्यंत प्रदूषणकारी घटक सामान्यतः सुसह्य मानले जातात.

दिल्लीत ते सुमारे साडे सातशे मायक्रोग्रॅम आढळून आले होते. म्हणजे दिल्लीच्या हवेमध्ये किती प्रचंड प्रदूषण आहे हे लक्षात येते. अर्थात, दिल्लीतील या प्रदूषणास अन्य अनेक कारणेही आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण हे एक मोठे कारण आहे. त्यासंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने सम – विषम सक्ती केलेली होती. डिझेल गाड्यांवरही निर्बंध घातले गेले. दिल्लीच्या परिसरात वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे डिझेलवर चालणारी जनित्रेही मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यातूनही प्रदूषण होत असते. फटाक्यांवर लाखो रुपयांचा त्या काळात चुराडा करावा असे शास्त्रात कोठेही लिहिलेले नाही.

आसमंतातील अंधार प्रकाशाने उजळवून टाकून आपला आनंद व्यक्त करण्याचे इतरही मार्ग आहेत. त्यामुळे इतरांना उपद्रवकारक ठरतील, असे कानठळ्या बसवणारे आणि घातक वायू आसमंतात पसरवणारे फटाके हेच काही दिवाळी साजरे करायचे साधन नव्हे. हे भान जेव्हा सामान्यजनांना येईल, तेव्हाच दिवाळीच्या किंवा अशा सण उत्सवांच्या जोडीने कळत – नकळत फोफावलेल्या अनिष्ट हानीकारक प्रथांना चाप लागेल. स्वेच्छेने अशा गैर गोष्टींचा त्याग केल्याचा आनंदही वेगळा असेल.

— रेश्मा नाईक,  बोरिवली 

Leave a Reply

Your email address will not be published.