fbpx

‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?’ – श्रवणीयतेबरोबरच प्रेक्षणीयतेचा वेगळा अनुभव देणारे गाणे.

मराठी रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार अशी ओळख निर्माण केलेले व नाटकाच्या जाहिरातीत ‘आणि….’ ची सुरुवात ज्यांच्या नावामुळे झाली त्या डॉ. काशिनाथ घाणेकरांवर आधारलेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटातील एक गाणे सध्या गाजते आहे. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील हे मूळ गाणे डॉ. काशिनाथ घाणेकर व आशा काळे या जोडगोळीवर चित्रित झाले होते. घाणेकरांवरील चरित्रपटात तेच गाणे सुबोध भावे व प्राजक्ता माळी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. ते गाणे म्हणजे लोकप्रिय गीत ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?’. दोन्ही गाण्याच्या चित्रिकरणातील साम्यस्थळांमुळे जुने गाणे नव्याने पाहताना एक वेगळीच मजा येते. या गाण्याची लोकप्रियता इतकी आहे की नवीन पिढीही उत्साहाने त्या गाण्याची लज्जत लुटताना दिसतेय.
गाण्याचे बोल पुढीलप्रमाणे आहेत

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय!
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय!

ग तुझं टप्पोरं डोलं जसं कोल्याचं जालं
माझं कालिज घोळं, त्यात मासोली झालं
माझ्या प्रीतिचा सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला अशी मी भुलणार नाय

रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जिवाची दैना
मी रं रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी ग जाळ्यामंदी आला आला आला
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला अशी मी गावनार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार..हाय!
तुझ्या पिरतिची रानी मी होनार हाय!

सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या या गाण्याला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. तर हेमंतकुमार व आशा भोसले यांनी ते गायले आहे. या गाण्याची मजेशीर आठवण गीतकार सुधीर मोघे यांनी लिहून ठेवली आहे. या चित्रपटातील नायक-नायिकेच्या एका छेडाछेडीच्या गाण्यासाठी संगीतकार हृदयनाथांनी त्यांच्या आधी करून ठेवलेल्या एका चालीचा मुखडा शब्दांसह ऐकवला. तो मुखडा तसाच ठेवून त्याला साजेसे पुढचे अंतरे सुधीर मोघे यांनी लिहिले आणि गीतकारांच्या भाषेत ‘दोन कलमी’ लोकप्रिय गाण्याचा जन्‍म झाला. कारण मुखड्याचे शब्द कवयित्री शांता शेळके यांचे होते. गाणे जरी छेडछाडीचं असलं तरी त्यात नायकाचा कुठेही धुसमुसळेपणा नाही आहे. डॉ.काशिनाथ घाणेकरांचा उत्स्फूर्त व रांगडा अभिनय, वेगळीच नृत्यशैली व त्यातील सहजता, आशा काळेंच्या मोहक व लटक्या अदा यामुळे गाण्यात कुठेही सवंगपणा जाणवत नाही. साहजिकच श्रवणीय चाल व स्वरांबरोबर गाणे प्रेक्षणीय सुद्धा आहे. अर्थातच ते मनातलं गाणंही आहे.

दीपक गुंडये – 9987194205

3 Replies to “‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?’ – श्रवणीयतेबरोबरच प्रेक्षणीयतेचा वेगळा अनुभव देणारे गाणे.”

Leave a Reply

Your email address will not be published.