fbpx

विल्मा रुडाल्फची संघर्षपूर्ण कहाणी !

ही गोष्ट आहे विल्मा रुडाल्फची. अमेरिकेतील एका गरीब निग्रो कुटुंबात विल्माचा जन्म झाला. विल्मा अमेरिकेतील टेनेसी प्रांतात राहणारी. तिचे वडील रेल्वेत हमाली करत तर आई धुण्याभांड्याची कामं. तिच्या आई – वडिलांचे ती विसावे अपत्य होती. वेळेच्या आधी ती जन्मली तेव्हा ती अशक्त असल्याने ती जगेल की नाही असंच वाटत होतं. त्यातच ती लहान असतानाच तिला आलेल्या आजारपणांमुळे तिला पोलिओ झाला. डॉक्टरांनी ती कधीच चालू शकणार नाही असे सांगितले. अर्धांगवायूचा झटका तिचा डावा पाय निकामी झाला आणि ती कधीच जमिनीवर पाय ठेवू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. थोडक्यात ती आयुष्यभर पांगळीच राहणार, असं सर्वांनाच वाटलं.
मात्र विल्माच्या आईला विश्वास होता की माझी मुलगी फक्त चालणार नाही तर ती धावेलही. पण या बिकट परिस्थितीत तिची आई तिच्यामागे खंबीरपणे उभी राहिली. तिने विल्माला सांगितेल की, पायाला लोखंडी पट्ट्या बांधून तुला आयुष्यात काहीही करता येईल. आईने तिची वेगवान धावपटू व्हायची इच्छा ओळखली. आईच्या प्रोत्साहनाचा परिणाम असा झाला की, तिने आधाराचा बूट काढून पहिलं पाऊल टाकलं.
गावापासून ८० किमी अंतरावर असलेल्या दवाखान्यात विल्माची आई सलग २ वर्षे तिला कडेवर घेवून गेली. तेंव्हा कुठे वयाच्या सहाव्या वर्षी विल्मा कुबड्यांनी चालायला लागली. डॉक्टरांनी सांगितले की रोज १८-२० तास तिच्या पायांची मसाज केली तर नक्कीच सुधारणा होईल. आई पुढे प्रश्न पडला की मी मसाज करीत बसले तर कामाला कोण जाईल ? मजुरी नाही मिळाली तर घर कसे चालेल ? मात्र म्हणतात ना ‘ where there is a will there is a way !’ आईने एक युक्ती केली. तिने विल्माच्या सर्व भावंडाना प्रत्येकाने रोज १ तास तिच्या पायाची मसाज करण्याचे काम दिले.त्यामुळे पायांमध्ये शक्ती येऊन विल्मा वयाच्या १२ व्या वर्षी कुबड्या शिवाय चालायला लागली. चार वर्षे तिने अशीच मेहनत केली आणि तिच्या पायांनी लय पकडली. इतरांनी तिची टिंगल केली. पण तिने जिद्द सोडली नाही आणि ती चक्क तेराव्या वर्षापासून धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला लागली.
मात्र ती येथे थांबली नाही. तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला सुरुवात केली.त्यात ती अव्वल आली. वयाच्या पंधराव्या वर्षी तिने टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला आणि तिथे तिला एड टेम्पल नावाचे प्रशिक्षक भेटले. त्यांनी तिला उत्तम प्रशिक्षण दिले. आणि या प्रयत्नांना, जिद्दीला यश येऊन १९५६ साली ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विल्माने ब्रांझ पदक मिळविले. आता तिला सुवर्णपदकाची ओढ लागली होती. तो क्षणही लवकरच आला सन १९६० मध्ये अजिंक्य ठरलेली जर्मनीची धावपटू “जुट्टा हेन’ विल्माच्या समोर होती. बघणाऱ्या सगळ्यांना विल्मा हरणार याची खात्रीच होती. पण ती स्पर्धा विल्माने जिंकली आणि त्यात तिला सुवर्णपदक मिळाले. यानंतरची २०० मीटरची स्पर्धासुद्धा विल्मानेच सुवर्णपदक मिळवून जिंकली. तिच्या जिद्दीने, प्रबळ इच्छाशक्तीने तिचे स्वप्न साकार केले
– दत्ता मालप

Leave a Reply

Your email address will not be published.