fbpx

डॉ. काशिनाथ घाणेकर : …आणि बेशिस्त वर्तनाने अकाली मृत्यू

परवा आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा चित्रपट किंबहुना चरित्रपट पहिला. त्या आधी नियतकालिकातून आणि समजमध्यामामधून बरीच साधक बाधक, उलट सुलट चर्चा वाचली. त्यामुळे अधिकच उत्कंठा वाढली आणि उत्साहाने चित्रपट बघायला गेले. चित्रपट समीक्षा वाचून गेले असल्याने विनाकारण चित्रपट पाहताना मनात नानाविध विचार येत राहिले आणि नेमकी तिथेच सर्वसामान्य प्रेक्षकाची गल्लत होते. मुक्त आणि कोऱ्या मनाने जर चित्रपट पहिला तर तो उत्तम च आहे असे माझे मत आहे. अभिनय हा विषय तर कुठेही खोट नसलेला म्हणून १००% वाखणावाच लागेल. सुबोध भावे, प्रसाद ओक, आनंद इंगळे आणि सर्वच व्यक्तिरेखा अत्यंत परिश्रम घेऊन साकारल्या आहेत याबद्दल दुमत नाही,पण…….पण… तरीही चित्रपट मनाला भिडणारा नाही. काशिनाथ यांचं दुखः, विफलता, याने मन सुन्न होत नाही. त्यांच्या मृत्यूचा प्रसंग सुद्धा मनाला स्पर्श करू शकत नाही. या मागचे नक्की कारण काय असावे हा माझ्या सारख्या सामान्य रसिकाला पडलेला प्रश्न आहे. सगळ काही उत्तम असून नेमकं काय चुकतंय हे कळत नाही.


एक स्त्री या नात्याने १७ वर्षांच्या वैवाहिक जीवनात एकदाही इरावतीला हमसून रडू येऊ नये ? ती शिकलेली आहे ,समंजस आहे पण तरी देखील आपल्या नवऱ्याच कांचनशी असलेलं प्रेमप्रकरण तिच्या लक्षात येऊ नये? आणि आल्यानंतर इतक्या शांतपणे तिनं ते हाताळावं याचं खूपच नवल वाटतं, निदान नवऱ्याला एक जाब विचारावासा नाही वाटला ? त्यामुळे चित्रपट खूपच जास्त समंजस व्यक्ति रेखानी भरलेला दिसतो, चित्रपटात काही भावस्पर्शी प्रसंग असते तर तो मनाला जास्त भिडला असता.
संपूर्ण चित्रपट पाहताना त्यांच्या जीवनाशी मला काय देणं घेणं ? असा भाव मनात कायम राहतो आणि त्यामुळे तो परका वाटतो. असं माझं वैयक्तिक मत आहे. काशिनाथ घाणेकर यांच्या परिपक्वतेबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार आपणास नाही कारण सर्वसामान्य संसारी पुरुषा सारखे ते वागले नाहीत याचा अर्थ ते अपरिपक्व होते असे म्हणणे अन्यायकारक आहे ! आपण त्यांचा अभिनय मात्र खूप परिपक्व होता एवढं ठामपणे म्हणू शकतो आणि सुबोध भावे ने तो तितक्याच ताकदीने निभवला आहे !
एकंदर चित्रपट चांगला असला तरी तो अजून परिणामकारक होऊ शकला असता एवढं मात्र नक्की! बाकी छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल बारीक कीस करत बसण्यापेक्षा ज्यांना काशिनाथ घाणेकर कोण होते ? त्यांचा अभिनय किती श्रेष्ठ दर्जाचा होता हे पहावयाचे असेल तर नक्कीच चित्रपट पाहताना आनंद मिळतो !
शेवटी घाणेकर देखील एक माणूस होते आणि त्या अनुषंगाने माणसाच्या मनात येणाऱ्या राग, लोभ, अहंकार, प्रेम, व्यसन या सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच हे स्वीकारले पाहिजे.
एक मात्र नक्की सांगता येईल की डॉ काशिनाथ घाणेकर यांच्या प्रमाणे कलंदर जीवन जगायचे असेल, मनमौजी आणि स्वच्छंदी जीवन जगायचे असेल तर लोकांच्या टीकेला सामोरे जावेच लागेल आणि बेशिस्त वर्तनाने मृत्यूला देखील सामोरे जावे लागेल ही गोष्ट त्यांच्या पुढील कलावंतांनी नक्कीच समजून घेतली आणि एक उत्तम धडा ही पिढी शिकली ! एक मराठी दर्जेदार चित्रपट मोठ्ठ्या संख्येने गर्दी खेचतो आहे ही मात्र अभिनंदनीय बाब आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांच आणि सुबोध भावे यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन !

(या ठिकाणी व्यक्त केलं ते माझं वैयक्तिक मत आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. जे मला वाटलं ते प्रामाणिकपणे सांगितलं एवढंच!)
= सौ नेहा मि. काळे, दहिसर.

One Reply to “डॉ. काशिनाथ घाणेकर : …आणि बेशिस्त वर्तनाने अकाली मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published.