fbpx

स्मरणांजली : अभिनेत्री स्मिता पाटील

पाणीदार डोळे आणि निरागस सौंदर्यानं परिपूर्ण असलेली अजरामर अभिनेत्री स्मिता पाटील. अभिनयाने, मोहक रूपाने आणि निखळ हास्याने सर्वांना आपलेसे करणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या स्मिता पाटील यांनी आपली प्रत्येक भूमिका संवेदनशीलतेने मांडल्या. समांतर सिनेमाचा श्वास मानल्या जाणाऱ्या स्मिता पाटील यांनी पडद्यावरील सौंदर्यांच्या साचेबद्ध कल्पना दुय्यम ठरवल्या. आजच्या दिवशी १३ डिसेंबर त्यांनी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. १९८६ मध्ये त्या हे जग सोडून गेल्या. सिनेसृष्टीतल्या सगळ्या नट्यांपेक्षा सगळ्यात वेगळी दिसणारी आणि आपली एक वेगळी छबी असणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील.
स्मिता पाटील या राजकीय वारसा असलेल्या घरात जन्मल्या पण त्यांना आवड मात्र अभिनयाची होती. सगळ्या अभिनेत्रींमध्ये त्या वेगळ्या दिसायच्या, वागायच्याही वेगळ्या आणि त्यामुळे असेल कदाचित त्यांचे सिनेमेही सगळ्यात वेगळे आणि हटके असायचे.


स्मिता पाटील यांच्या आईने त्यांना नेहमी अधिकारांसाठी लढायला शिकवलं. याचाच प्रभाव कुठेतरी त्यांच्या सिनेमावर पडला. सिनेमासोबत आपल्या सामाजिक जाणिवाही त्यांनी नेहमी जागृत ठेवल्या. खासदार शिवाजीराव पाटील यांच्या घरात जन्मलेल्या स्मिताताई १९७० मध्ये पहिल्यांदा दूरदर्शनवर बातम्या वाचताना दिसल्या. याच दरम्यान, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या त्या नजरेस पडल्या. त्यांच्या अभिनयाची आणि त्यांच्या वेगळेपणाची जादू बेनेगल यांच्यावरही पडली आणि त्यांनी स्मिता यांना सिनेमात काम करण्याची संधी दिली. विजय तेंडुलकरांच्या नाटकावर आधारित ‘निशांत’ चित्रपटापासून खऱ्या अर्थाने स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असे म्हणता येईल. निशांतमधल्या ‘रूक्मिणी’ने भारतीय चित्रपट सृष्टीला स्मिता पाटीलसारखा चेहरा दिला. ‘मंथन’ मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली. या व्यक्तिरेखीतील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे दाखवली. हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित ‘भूमिका ‘ मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणाऱ्या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे मांडल्या. या भूमिकेसाठी स्मिता पाटील राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरल्या. मराठीतील प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या ‘चक्र’ चित्रपाटातील ‘अम्मा’ ह्या भूमिकेबद्दल अभिनयासाठी स्मिता पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. केतन मेहता दिग्दर्शित ‘मिर्च मसाला’मधील सोनबाईची भूमिका प्रचंड गाजली. परंतु, स्मिता पाटील यांच्या मृत्यूपूर्वी हा शेवटचा चित्रपट ठरला. ‘जैत रे जैत’ चित्रपटात ‘चिंधी’ या नायिकेच्या भूमिकेत स्मिता पाटील आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील गाणीही तितकीच अजरामर आहेत. मराठीतील ‘उंबरठा’ चित्रपटातील सुलभा महाजन म्हणजे जणूकाही आपल्या मनातली एक भावना आहे, असे त्याकाळी अनेक महिलांना वाटलं.’अर्थ’, ‘भूमिका’, ‘मंडी’ अशा समांतर सिनेमात त्यांनी उत्तम कामगिरी करत सगळ्यांची मन जिकंली. ‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’ या मराठी सिनेमांत तर त्यांनी त्यांची एक वेळगीच छाप चाहत्यांसमोर ठेवली. त्यांच्या या अप्रतिम अभिनयामुळे त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यातही आलं.


सिनेसृष्टीचा असा यशस्वी प्रवास करताना त्यांनी व्यावसायिक सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. राज खोसला यांच्या ‘नमक हलाल’ या सिनेमात त्यांचं अमिताभ बच्चनसोबतचं ‘आज रपट जाएं तो’ हे लोकप्रिय गाणं आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. राज बब्बर यांच्या येण्यानं त्यांचं आयुष्यच बदललं. स्मिता यांच्या ‘अदां’वर राज बब्बर विवाहित असूनही ‘फिदा’ झाले. स्मिता पाटीलही त्यांच्या प्रेमात अवघ्या बुडाल्या होत्या.राज यांनी स्मिता यांच्या प्रेमासाठी त्यांची पत्नी नादिरा बब्बर यांना सोडून दिले. त्यावेळेस स्मिता आणि राज यांचं लग्न हे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि मीडियासाठी धक्कादायक होतं. याच निर्णयामुळे, स्मिता आणि राज यांना त्यांच्या चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं.
पण तरीही त्यांच्या दर्जेदार अभिनयाने आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे त्या आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या भूमिकांमुळे त्या अजरामरच राहिल्या. मरण येणार असेल तर त्याची चाहूल आधीच त्या व्यक्तीला लागते, असे बोलले जाते. बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटीलच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. मरणाच्या काही दिवस आधीच स्मिता यांनी त्यांच्या मेकअप आर्टीस्ट दीपक सावंत यांना ‘मेल्यानंतर मला लग्नात जसे नवरीला सजवतात तसे सजव’ असे सांगितले होते. स्मिता यांचे ते वाक्य ऐकून दीपक यांना धक्का बसला होता पण काही दिवसांतच दीपक यांच्यावर स्मिता पाटील यांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली. विलक्षण अभिनय, सुंदर डोळे, अतिशय हुशार, सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजची प्रत्येक अभिनेत्री जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, ‘अशी स्मिता पाटील आता होणे नाही’ हेच खरे..
रवींद्र मालुसरे

One Reply to “स्मरणांजली : अभिनेत्री स्मिता पाटील”

  1. अप्रतिम! हे.वाचता स्मिता पाटीलची चित्र झलक सर्रर्रकन् डोळ्यासमोर तरळून गेली… मंथन मधली तिची गायरान भूमिका आठवली….अर्थ मधली अति सुंदर मॉडेल अनुरागीनी आठवली… कसदार अभिनय आणि मर्दानी धुंद सौंदर्याचा अप्रतिम मिलाफ असलेली तेव्हाच्या बॉलीवूड मधील एकमेव अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published.