fbpx

पॉवर ची पॉवर !!!

बाजीगर सिनेमातील तो सीन बऱ्याच जणाांना आठवत असेल ज्या मध्ये शाहरुख खान त्याला मिळालेल्या पॉवर ऑफ एटॉर्नी द्वारे मालकाचा संपूर्ण बिझनेस आपल्या नावावर करून घेतो.
हा सीन बघताना काही जणाांच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की खरोखरच पॉवर ऑफ एटॉर्नी द्वारे आपण काहीही करू शकतो का? तर याचा उत्तर नाही असं आहे. मग त्या सिनेमा मध्ये दाखवलं गेलं ते संपूर्ण खोटं आहे का? तर याचंही  उत्तर नाही असंच आहे!

मग ही पॉवर ऑफ एटॉर्नी (Power of Attorney) अर्थात “कुलमुखत्यारपत्र” म्हणजे नक्की काय आहे ते बघूया.

पॉवर ऑफ एटॉर्नी हे असं लीगल डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा आर्थिक अथवा मालमत्तेसंदर्भातील व्यवहाराांमध्ये स्वतः उपस्थित राहणे शक्य नसते अश्या वेळी ती व्यक्ती पॉवर ऑफ एटॉर्नीद्वारे स्वतःचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देऊन तो व्यवहार पूर्ण करू शकते.

थोडक्यात स्वतःचे अधिकार कायदेशीररीत्या दुसऱ्याच्या स्वाधीन करणे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून तो एजन्ट आपल्या वतीने सर्व कामे करू शकतो.

पॉवर ऑफ एटॉर्नी ही कशासाठी केली जाते ?

उदा. १)आपल्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी
२) काही काळासाठी जर आपण बाहेरच्या देशात जाणार असू तर भारतातील आपल्या नावावर असणाऱ्या सर्व स्थावर अथवा जंगम मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी ;
३) वार्धक्यामुळे घराबाहेर जाण्याची शारीररक क्षमता नसल्यामुळे सरकारी कार्यालये किंवा बँक अश्या तत्सम ठिकाणी असलेले व्यवहार करणेसाठी; इत्यादी.

वर उल्लेख केलेल्या अथवा तत्सम कोणत्याही कारणामुळे जर एखाद्या व्यक्तीला समक्ष येऊन व्यवहार करणे शक्य नसल्यास कायद्याने पॉवर ऑफ एटॉर्नी द्वारे नेमलेल्या व्यक्तीद्वारे अशी कामे करण्याची मुभा दिलेली आहे. मात्र असे असले तरीही कायद्याने त्यावर काही बंधने घातली आहेत जेणेकरून पॉवर ऑफ एटॉर्नी चा कोणीही गैरवापर करू नये.
पॉवर ऑफ एटॉर्नी मध्ये देणारा हा प्रिंसिपल असतो आणि ज्याला ती द्यायची आहे त्या व्यक्तीला एजन्ट/ एटॉर्नी म्हटलं जातं. हा एजन्ट प्रिंसिपल च्या वतीने ती सर्व कामे करतो जी करण्याचा अधिकार प्रिंसिपल ने त्याला दिलेला असतो.

कायदयाप्रमाणे पॉवर ऑफ एटॉर्नी म्हणजेच “कुलमुखत्यारपत्र” हे कोणती व्यक्ती बनवू शकते?

कायद्याप्रमाणे कोणतीही सज्ञान व्यक्ती आणि ज्या व्यक्तीला कोणताही मानसिक आजार झालेला नाहीये अशी व्यक्ती पॉवर ऑफ एटॉर्नी करू शकते.

पॉवर ऑफ एटॉर्नी चे मुख्यत्वे दोन प्रकार असतात :-

१) जनरल पॉवर ऑफ एटॉर्नी
२) स्पेशल पॉवर ऑफ एटॉर्नी

१) जनरल पॉवर ऑफ एटॉर्नी ही वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यासाठी दिली जाते. उदा. बँकेतले व्यवहार, त्याच्याशी निगडित असलेली इतर कामे किंवा सरकारी कामासाठी जिथे त्या व्यक्तीची सही आवश्यक आहे, त्याचप्रमाणे इतर निमसरकारी कार्यालयांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी, तसच न्यायालयीन कामे इत्यादी ठिकाणी तो एजन्ट प्रिंसिपल च्या वतीने प्रतिनिधित्व करून व्यवहार करू शकतो . जनरल पॉवर ऑफ एटॉर्नी मध्ये एजन्टला अनेक विषयांशी असलेले व्यवहार करण्याचे व्यापक अधिकारी दिलेले असतात.

२) स्पेशल पॉवर ऑफ एटॉर्नी मध्ये एजन्ट ला फक्त त्या दस्तावेज मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट विषयाशी संबंधित असलेले व्यवहार करण्याचे अधिकार दिलेले असतात. त्यामुळेच त्या विशिष्ट विषयाशी संबंधित व्यवहार संपला की आपोआप ती स्पेशल पॉवर ऑफ एटॉर्नी संपुष्टात येते. उदा. एखाद्या जमिनीची विक्री अथवा खरेदी करायची असल्यास किंवा कोर्टात एखाद्या प्रकरणात केस फाईल करण्यासाठी फक्त तेवढ्याच विषयापुरती पॉवर ऑफ एटॉर्नी देता येते.

याशिवाय आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे कधीही रद्द न होणारी अशी इर्रिवोकेबल (अपरिहार्य/ चिरंतन ) पॉवर ऑफ ऍटनी. सर्वसामान्यपणे प्रिंसिपल स्वतः लेखी स्वरूपात एजन्ट ला कळवून पॉवर ऑफ एटॉर्नी कधीही मागे घेऊ शकतो.परंतु विशेषतः जर एजन्ट चे हक्क आणि अधिकार याच्याशी निगडित असलेल्या व्यवहारांबदद्ल पॉवर ऑफ ऍटर्नी देण्याची वेळ आली तर प्रिंसिपल हा एजन्ट ला इर्रिवोकेबल (अपरिहार्य/चिरंतन ) पॉवर ऑफ ऍटर्नी देतो. अशी पॉवर ऑफ ऍटर्नी प्रिंसिपल ला मागे घेता येत नाही अथवा रद्दही करता येत नाही शिवाय प्रिंसिपल च्या मृत्यूनांतर ही ती अबाधित राहते. अश्या पॉवर ऑफ ऍटर्नी मध्ये खास करून आर्थिक मोबदल्याचा समावेश असतो.

उदा. एखाद्या जमिनीच्या मालकाने एखाद्या बिल्डर ला ती जागा विकसित करायला दिली आणि त्या बदल्यात काही ठराविक रक्कम किंवा विकसित झालेल्या जागेतील काही भाग मागितला असेल तर अश्या वेळी जमीन मालक बिल्डर च्या नावे इर्रिवोकेबल (अपरिहार्य/ चिरंतन ) पॉवर ऑफ ऍटर्नी करतो.

पॉवर ऑफ एटॉर्नी कोणत्या व्यक्तीला देता येते ?

पॉवर ऑफ ऍटर्नी देताना कोणतेही बंधन कायद्याने घातलेले नाही. पॉवर ऑफ ऍटर्नी कोणत्याही व्यक्तीला देता येते. त्यामध्ये तुमची आई बाबा बहीण भाऊ मुलगा मुलगी इ. सुद्धा असू शकतात अथवा इतर नातेवाईक वा जवळचे मित्र मैत्रीण. फक्त ज्या व्यक्तीला ती द्यायची आहे ती व्यक्ती कायद्याने सज्ञान असावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला पॉवर ऑफ एटॉर्नी द्यायची आहे ती व्यक्ती आपली जवळची आणि अत्यंत विश्वासू असावी जेणेकरून पॉवर ऑफ एटॉर्नी चा दुरुपयोग होणार नाही.

पॉवर ऑफ ऍटर्नी हि एकापेक्षा अधिक व्यक्ती सामायिकपणे सुद्धा देऊ शकतात. कायद्याप्रमाणे जर प्रिंसिपल म्हणजेच ज्याने पॉवर ऑफ ऍटर्नी दिलेली आहे त्याचा मृत्यू झाल्यास ती पॉवर ऑफ ऍटर्नी आपोआप रद्द होते . परंतु जर एकापेक्षा अधिक व्यक्तींनी पॉवर ऑफ ऍटर्नी दिलेली असेल अश्या केस मध्ये जर त्यातील एकाचा मृत्यू झाल्यास ती पॉवर ऑफ ऍटर्नी आपोआप रद्द होत नाही.
पॉवर ऑफ ऍटर्नी हि फक्त अथॉरिटी आहे ज्यायोगे आपल्या वतीने आपला प्रतिनिधी (Agent ) कायदेशीर व्यवहार करू शकतो. म्हणूनच पॉवर ऑफ ऍटर्नी execute केल्यानांतरही जर प्रिंसिपल ने स्वतः त्यात नमूद केलेलं एखाद काम केलं अथवा व्यवहार केला तर तो बेकायदेशीर ठरत नाही. म्हणजेच पॉवर ऑफ ऍटर्नी असताना सुद्धा ती व्यक्ती स्वतः व्यवहार करू शकते.

पॉवर ऑफ ऍटर्नी देणाऱ्याचे म्हणजेच प्रिंसिपल चे अधिकार आणि कर्तव्ये :-

१) पॉवर ऑफ ऍटर्नी कोणाला द्यायची ह्याचा संपूर्ण अधिकार हा प्रिंसिपल चा असतो.
२) कोणत्या कामासंदर्भात अथवा व्यवहारांमध्ये पॉवर ऑफ ऍटर्नी द्यायची हे सुद्धा अधिकार प्रिंसिपल चा असतो.
३) पॉवर ऑफ ऍटर्नी मध्ये ऍटर्नी ला पूर्ण व्यापक अधिकार दयायचे का त्याला मर्यादित अधिकार दयायचे हे प्रिंसिपल ठरवू शकतो.
४) पॉवर ऑफ ऍटर्नी मध्ये एजन्ट ने प्रिंसिपल च्या वतीने केलेले सर्व कायदेशीर व्यवहार प्रिंसिपल वर बंधनकारक असतात.
५) पॉवर ऑफ ऍटर्नी दिल्यावर प्रिंसिपल कोणत्याही वेळी ती रिव्होक करू शकतो म्हणजेच पॉवर ऑफ ऍटर्नी रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार हा प्रिंसिपल चा असतो.

पॉवर ऑफ ऍटर्नी घेणाऱ्याचे म्हणजेच एजन्ट चे अधिकार आणि कर्तव्ये :-

१) एजन्ट हा प्रिंसिपल च्या वतीने काम करण्यासाठी नेमलेला असतो म्हणूनच प्रिंसिपल ने दिलेल्या अधिकारांच्या कक्षेत राहूनच व्यवहार करणे हे एजन्ट वर बंधनकारक असते. जर पॉवर ऑफ ऍटर्नी मध्ये नमूद केलेल्या व्यवहारांव्यतिरिक्त एजन्ट ने एखादा व्यवहार केला तर असा व्यवहार प्रिंसिपल वर बंधनकारक असणार नाही आणि त्याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी ही एजन्ट ची असते.
२) सर्वसाधारणपणे एजन्ट म्हणून प्रिंसिपल च्या वतीने व्यवहार करण्यासाठी मानधन घेतले जात नाही. पण काही वेळेस एजन्ट म्हणून काम करण्यासाठी मोबदला मागितला जातो. परंतु जर पॉवर ऑफ ऍटर्नी मध्ये मानधन / मोबदला देण्याविषयी अथवा न देण्याविषयी स्वतंत्र आणि स्पष्टपणे उल्लेख केलेला असल्यास एजन्ट ला ते बंधनकारक असेल.
३) एजन्ट कोणत्याही वेळी एजन्ट म्हणून काम करण्याचे नाकारू शकतो. फक्त तसे करण्याआधी एजन्ट ने प्रिंसिपल ला लेखी कळवणे आवश्यक आहे.

पॉवर ऑफ ऍटर्नी कशी लिहावी आणि कोणती काळजी घ्यावी?:-

कायदयामध्ये पॉवर ऑफ ऍटर्नी चा कोणताही विशिष्ट फॉरमॅट नाही. परंतु त्यामध्ये खालील मुद्दे असले पाहिजेत.
१) जी व्यक्ती पॉवर ऑफ ऍटर्नी देणार आहे तिचे संपूर्ण नाव, वय तसेच राहण्याचा पत्ता. इ.
२) ज्या व्यक्तीला पॉवर ऑफ ऍटर्नी दयायाची आहे तिचे संपूर्ण नाव, वय, रहाण्याचा पत्ता .
३) पॉवर ऑफ ऍटर्नी का दिली जात आहे याचे थोडक्यात वर्णन. उदा. वृद्धत्व , शारीरिक कारण, देशाबाहेर वास्तव्य इत्यादी.

४) कोणत्या मालमत्तेच्या संदर्भात कोणत्या पॉवर्स दिल्या जात आहेत याचा सविस्तर वर्णन. जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी असेल तरीही कोणत्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात ही पॉवर दिलेली आहे त्याचे विस्तृत वर्णन असावे. ज्या स्थावर/ जंगम मालमत्ते संदर्भात पॉवर दयायाची असेल तिचे वर्णन सर्वात शेवटी शेड्युल मध्ये लिहावे.
५) त्याचप्रमाणे एजन्ट ने कोणते काम कोणत्या कालावधी पर्यंत करायचे आहे याचाही तपशील नमूद करावा.
६) शेवटी प्रिंसिपल म्हणजेच देणाऱ्याची सही आणि एजन्ट म्हणजेच घेणाऱ्याची सही असणे आवश्यक आहे.
७)सर्वात शेवटी दोन साक्षीदारांच्या सह्या असणे गरजेचे आहे.

पॉवर ऑफ ऍटर्नी ची अंमलबजावणी (execution ) :-
पॉवर ऑफ ऍटर्नी ची अंमलबजावणी (execution) ही भारतात राहणाऱ्यांसाठी आणि भारताबाहेर राहणाऱ्यांसाठी वेगवेगळी आहे:

१) कायमचे किंवा तात्पुरत्या कालावधीसाठी भारतात असणाऱ्या लोकांसाठी पॉवर ऑफ ऍटर्नी ची अंमलबजावणी (execution) खालीलप्रमाणे :-

a ) प्रथम ड्राफ्ट पॉवर ऑफ ऍटर्नी योग्य त्या value च्या स्टॅम्प पेपर वर तयार करावी. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये ५०० रुपयाचा स्टॅम्प पेपर लागतो. (पॉवर ऑफ ऍटर्नी साठी स्टॅम्प पेपर विकत घेताना तो पॉवर ऑफ ऍटर्नी देणाऱ्या व्यक्तीच्या नावाने म्हणजेच प्रिंसिपल च्या नावाने घ्यावा. स्टॅम्प पेपर च्या ऐवजी तेवढ्या value चा फ्रँकिंग काही अधिकृत बँकाांकडून करून दिला जातो. स्टॅम्प पेपर घेणे शक्य नसेल तर असं फ्रँकिंग करून घेतलं तरी ते कायदेशीर असतं .)
b ) नंतर पॉवर ऑफ ऍटर्नी च्या प्रत्येक पानावर प्रिंसिपल ने सही करावी.
c ) त्यानांतर शेवटच्या पानावर ऍटर्नी ने पॉवर ऑफ ऍटर्नी स्वीकारल्याची सही करावी.
d) कायद्याप्रमाणे पॉवर ऑफ ऍटर्नी ची नोटरी किंवा रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही. परंतु ती पॉवर ऑफ ऍटर्नी अधिक प्रमाणित (authenticate ) व्हावी म्हणून ती नोटरी करून घेणे हिताचे असते .

अत्यंत महत्वाचे म्हणजे स्थावर मालमत्तेच्या विक्रीसंबांधत असलेल्या पॉवर ऑफ ऍटर्नी चे रेजिस्ट्रेशनअनिर्वार्य असते. हे रेजिस्ट्रेशन सबरजिस्ट्रार केले जाते.

२) भारताबाहेरील व्यक्तीने दिलेल्या पॉवर ऑफ ऍटर्नीची अंमलबजावणी (execution) खालीलप्रमाणे:-

a) त्या व्यक्तीने पॉवर ऑफ ऍटर्नी साध्या पेपर वर प्रिंट करावी.
b) पॉवर ऑफ ऍटर्नी च्या प्रत्येक पानावर प्रिंसिपल ने सह्या कराव्या.
c) त्यानंतर त्या देशातील भारतीय दूतावासातील (Indian Embassy/ Indian Consulate) अधिकाऱ्या समोर हजर राहून पॉवर ऑफ ऍटर्नी प्रमाणित (Attest) करून घ्यावी. तो अधिकारी ओरिजिनल पॉवर ऑफ ऍटर्नी वर योग्य तो स्टॅम्प लावून सही करेल.
d) त्यानांतर ती पॉवर ऑफ ऍटर्नी भारतात पाठवून ज्या व्यक्तीला पॉवर दिली गेली आहे तो ऍटर्नी अर्थात एजन्ट त्या वर सही करून मुद्रांक शुल्क कार्यालयात जाऊन त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्क भरेल व नंतर ती पॉवर ऑफ ऍटर्नी नोटराइज्ड करून घेईल.वरील प्रकारे पॉवर ऑफ ऍटर्नी execute होते.

पॉवर ऑफ ऍटर्नी रद्द करण्याविषयी:-

पॉवर ऑफ ऍटर्नी ही खालील पैकी कोणत्याही एका परिस्तिथी मध्ये रद्द होऊ शकते:
१) पॉवर ऑफ ऍटर्नी देण्याऱ्याच्या अथवा घेणाऱ्याच्या मृत्यूनंतर .
२) जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी देण्याऱ्याने स्वतः लेखी स्वरूपात ती मागे घेतली अथवा रद्द केली.
३) ज्या विशिष्ट कामासाठी/व्यवहारासाठी पॉवर दिली गेली आहे तो व्यवहार पूर्ण झाल्यावर.
४) एजन्ट ने स्वतः लेखी स्वरूपात एजन्ट म्हणून काम करण्यास नकार दिल्यावर.
५) इर्रीवोकेबल पॉवर ऑफ ऍटर्नी रद्द करता येत नाही.
६) याव्यतिरिक्त जर एजन्ट ने पॉवर ऑफ ऍटर्नी मध्ये नमूद केलेल्या व्यवहारातील एखादा व्यवहार सुरु केलेला असेल तर अश्या वेळी प्रिंसिपल ला पॉवर ऑफ ऍटर्नी मधेच रद्द करता येऊ शकत नाही.

• थोडक्यात पॉवर ऑफ एटॉर्नी द्वारे एजन्ट ला प्रिंसिपल चे सर्व अधिकार प्राप्त होतात. पण ते अधिकार एजन्टला अत्यंत काळजीपूर्वक वापरावे लागतात याशिवाय पॉवर ऑफ एटॉर्नी च्या मर्यादेबाहेर जाऊन केलेला कोणताही व्यवहार हा पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो आणि प्रिंसिपल ला तो अजिबात बंधनकारक नसतो. विशेषतः जमीन खरेदी विक्रीच्या बाबतीत करण्यात येणाऱ्या पॉवर ऑफ एटॉर्नी मध्ये त्याचा सुस्पष्ट पणे उल्लेख असणं जरुरीच आहे जेणेकरून पॉवर ऑफ एटॉर्नी चा संभाव्य गैरवापर टाळता येऊ शकेल.
• कायद्याप्रमाणे पॉवर ऑफ ऍटर्नी ची नोटरी बंधनकारक नाही. पण जर नोटरी पब्लिक उपलब्ध नसेल तर अश्या वेळी पॉवर ऑफ एटॉर्नी च्या section ४ अनुसार ज्या ठिकाणी पॉवर ऑफ एटॉर्नी execute करायची आहे ते अधिकारक्षेत्र ज्या जिल्हा न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कक्षेत येत त्या न्यायालयामध्ये पॉवर ऑफ एटॉर्नी प्रतिज्ञापत्रासह दाखल करून प्रमाणित करता येते. परंतु ही पद्धत खूपच दुर्मिळ असून बऱ्याच जणाांना याची माहिती नसल्याचं दिसून येतं.

• पूर्वी काही ठिकाणी पॉवर ऑफ एटॉर्नी च्या द्वारे स्थावर मालमत्तेची खरेदी, विक्री, हस्ताांतरण केली जात असे. यामध्ये सरकारचे मुद्रांक शुल्क न भरता मालमत्ता दुसऱ्याला हस्ताांतरीत केली जात असे. परंतु नुकतांच माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण अश्या एका केसचा निकाल देताना अश्या प्रकारचं  मालमत्ता हस्तांतरण पूर्णपणे अवैध ठरवले आहे. त्यामुळे आता नोंदणीकृत ख्ररेदीखताद्वारे केले जाणारे मालमत्ता हस्तांतरणच कायदेशीर मानले जाईल . त्यामुळे आता पॉवर ऑफ एटॉर्नी चा मूळ उद्देश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

त्यामुळे बाजीगर सिनेमामिील शाहरुखने पॉवर ऑफ एटॉर्नी द्वारे प्रॉपटी नावावर करण्याचा सीन दाखवला तो प्रत्यक्षात एखाद्या पॉवर एजन्ट ने करणे कठीण असले तरी अशक्य नाही.

म्हणूनच योग्य प्रकारची काळजी घेऊन आणि कायद्यातील तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली पॉवर ऑफ एटॉर्नी केल्यास आपल्या अनुपस्थितीत आपल्या प्रॉपटीच योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकेल आणि पॉवर ऑफ एटॉर्नी जर योग्य प्रकारे वापरली तर प्रॉपटी व्यवस्थपनासाठी ते नक्कीच एक पॉवरफुल साधन आहे हे निश्चित !!

Adv. Swapna V. Gokhale
Mob. – 9220793799
E-mail – advswapnagokhale@gmail.com

3 Replies to “पॉवर ची पॉवर !!!”

Leave a Reply

Your email address will not be published.