fbpx

लतादीदी… मनातली

(गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदींच्या वयाला २८ सप्टेंबर २०१९ ला ९० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने…)

अखेरचा हा तुला दंडवत,
सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा,
देऊळ सोडून धाव
तुझ्या शिवारी जगले,
हसले
कडी कपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले,
उरलं मागं नाव
हाय सोडूनी जाते आता
ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता,
धरती दे गं ठाव

गानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल काही बोलावे, लिहावे, सांगावे… गायिका म्हणून त्या सर्वश्रेष्ठ आहेतच, पण त्यांनी संगीतकार म्हणूनही मोठे योगदान दिले आहे. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी संगीतकार म्हणून केलेला छोटासा, पण प्रतिभावान प्रवास चिरस्मरणीय ठरला आहे. चालींमधील वैशिष्ट्यपूर्ण माधुर्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मराठी रसिकांच्या ओठी आजही रुळताना दिसत आहेत. चालीत माधुर्य आणि प्रामाणिकपणा असला, की ते गाणे हृदयाला भिडते. लता मंगेशकरांनी संगीतकार या नात्याने पाच सिनेमांना  संगीत दिले. यातील प्रत्येक गाणे कमालीच्या गोडव्याने भारले आहे. अशी गाणी काळजाच्या कोपऱ्यात जाऊन कायमची विसावतात त्या वेळी त्या संगीताची, संगीतकाराची महती लक्षात येते… 


१९६४ मध्ये आलेल्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या सिनेमात त्यांनी ‘आनंदघन’ या आपल्या नावानेच संगीत दिले आणि गायल्याही होत्या.एक संगीतकार म्हणून बाई किती श्रेष्ठ दर्जाच्या होत्या हे गाणे नीट ऐकले तर लक्षात येते. ‘मराठा तितुका मेळवावा’ या सिनेमातील या गाण्यातून शिवकालीन काळ डोळ्यासमोर त्या आणतातच, पण दगडाच्या देशा, कणखर देशाच्या राकटपणाबरोबर मराठी मातीच्या पराक्रमाचीही महती गाताना दिसतात. याशिवाय शिवाजी महाराजांच्या जोडीने स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या जोडीदारांच्या मनाची ओढ, व्यथा अशा काही शब्दात सांगून जातात, की आपण त्या सिनेमाशी आणि गाण्यांशी आयुष्यभर जोडले जातो. त्या काळातील माताभगिनींची आर्त भावना ही गाणी  व्यक्त तर करताच, पण सामान्य माणसांच्या जगण्यातील खरा आनंदही हे गाणे असे काही अभिव्यक्त करतात की ते या मराठी मातीपासून वेगळी करता येत नाही. महाराष्ट्र भूमीच्या रांगडेपणाचा, साधेपणाचा अस्सल सुवास, त्यामधून दरवळताना दिसतो आणि म्हणूनच पाच दशके उलटून गेल्यानंतरही हे गाणे गुणगुणावेसे वाटताना अस्वस्थ करून सोडते.

अखेरचा  हा तुला दंडवत या गाण्यांच्या चालींबरोबरच एक गायक म्हणून स्वत: बाईंचा लागलेला स्वर अलीकडच्या काळातही झपाट्याने बदलत आणि बरेचसे हरवत चाललेल्या सद्यस्थितीत अस्वस्थ आणि कासावीस करून सोडतो आहे.
माणसाच्या आठवणी या कधी रम्य भूतकाळाच्या.. कधी मोरपिसी सुखद आनंद देणाऱ्या..कधी अनोख्या विश्वाची सफर घडविणाऱ्या.. तर कधी आयुष्यभर शिदोरीसारख्या पुरून उरणाऱ्या..! आपला गावही एकेकाळी तसाच होता. आठवणीतला.. प्रेमाला ओलावा असणारा ! नात्यांची वीण घट्ट करणारा.. कोणत्याही संस्कार वर्गात न जाता कळत न कळत संस्काराची खाण देणारा.. आपल्याला हे संस्कार मोकळ्या वातावरणात व विनामूल्य मिळाले. चार दशकपूर्वीची पिढी खरंच नशीबवान!’ आज मात्र काळ बदलला आहे, गावांचे झपाट्याने शहरीकरण होते आहे. धनदांडगे हायवे, पायवाटांसह उघडे-बोडके डोंगर बाजारभावाने खरेदी करीत ग्राम्य संस्कृती दिवसेंदिवस उखडत चालले आहेत. गेल्या २५ वर्षात तर हे चित्र अधिकाधिक गडद होत चालल्याचा अनुभव आपण घेतो आहोत. लतादिंदिना मात्र याची चाहूल ५० वर्षापूर्वी लागली असावी ती त्यांनी आनंदघन नावाने या गाण्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या. लतादीदींच्या प्रतिभेतला हा निर्व्याज प्रेम देणारा ‘आपला गाव हरवला का?’ की गाव आहे.. पण तिथे माणसंच नाहीत? की नातीच घट्ट नाहीत? की.. आपल्या आवडीनिवडी बदलल्या.. गावाकडे  बघण्याचे संदर्भ बदलले?.. की आपण सद्य:स्थिती आणि वास्तव स्वीकारले आहे.

गावाकडचे दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात निसर्ग आणि नात्यांचा ओलावा यांचे रम्य स्वप्न होते. पैशाची श्रीमंती नव्हती पण खाण्याची ददातही नव्हती. डांबरी रस्ते, दळणवळणाची साधने वाढली. विहिरीचे पाणी, वीज, पंखे नसूनही कौलारू घरात छान झोप लागायची. त्या काळात टीव्ही, ट्रान्झिस्टर असा प्रकार नव्हता, त्यामुळे इतरांबरोबरच्या गप्पांमधूनच करमणूक होई, त्यातून जीवनाला उपयोगी पडणारी शिदोरी मिळे. आता गाव बदलला त्यापेक्षा सुधारला.
सध्या फोन मोबाइलमुळे संपर्क वाढला आहे. पूर्वी एकमेकांशी बोलणे होत नसे त्यामुळे लांबच्या अंतरामुळे नातेवाईकांना भेटण्याची ओढ,  गोडी,  आतुरता असायची.परंतु आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट होत असल्यामुळे गावाला जाण्यात नावीन्य राहिलेले नाही. खरंच काळ बदललाय? की जगण्याचे,  जीवनाकडे बघण्याचे संदर्भ ? बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण, नोकरी व पर्यायाने सुबत्ता मिळाली, पण नाती अन माणसं दुरावलीत? त्यामुळे गाव लाभलेली पण साठीकडे झुकलेल्या पिढीचे हे गाणे म्हणजे ह्रदयवदन आहे.

– रवींद्र मालुसरे
अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704

4 Replies to “लतादीदी… मनातली”

  1. कोकिल कंठी लता दीदी को जन्मदिन की बहुत बहुत बधाई अभिनंदन आप शतायु हो।

  2. कुठे ते आर्त स्वर आणि कुठे आजच्या किंकाळ्या . . . . .

Leave a Reply

Your email address will not be published.