fbpx

पर्यावरण रक्षणासाठी ग्रेट ग्रेटाची कामगिरी

सयुंक्त राष्ट्रांची महत्त्वाची समजली जाणारी हवामान कृती परिषद सध्या चांगलीच गाजत आहे ती एका १६ वर्षीय मुलीमुळे… ग्रेटा थनबर्ग असं या लहान स्विडिश पर्यावरण कार्यकर्तीचं नाव असून पर्यावरण संवर्धनासाठी ती मोलाचं योगदान देत आहे. तिने हवामान कृती परिषदेत पर्यावरण संवर्धनाबाबत संताप व्यक्त केला. तिने या परिषदेत चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह जगभरातील नेत्यांवर धारेवर धरलं असून, ‘तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय’ असा थेट आरोप केला आहे. 
गेल्या आठवड्यात या किशोरवयीन मुलीने अमेरिकेत ‘व्हाइट हाउस’ या अध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन केले. जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या बलाढ्य अध्यक्षांना आंदोलनातून आवाहन करण्याचा व त्यासाठी स्वीडनहून हजारो मैलाचा प्रवास करण्याचा खटाटोप कोण कशासाठी करेल? तर हे सर्व चालले आहे ते जागतिक तापमान किंवा हवामान बदलाच्या चिंतेतून. ही समस्या एक-दोन देशांना नाही; तर संपूर्ण जगालाच घातक ठरणार असून, यासाठी वेळीच पावले उचलून आपल्या वसुंधरेचा बचाव करण्यासाठी ‘मोठ्यां’ना जागे करण्याचा उद्देश स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग हिचा या आंदोलनामागे होता.


ग्रेटा ही ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल थांबवण्यासाठी प्रयत्नात असणारी स्विडिश कार्यकर्ती आहे. हवामानातील बदल थांबवण्यासाठी तिने स्विडिश संसदेबाहेर संप सुरू केला होता. त्याचबरोबर तिने या विषयासंदर्भात शाळेतही संप केला होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये तिने टेडेक्सटॉकहोम मध्ये भाषण दिले होते, जे प्रतिष्ठेचे समजले जाते. यावर्षीप्रमाणे तिने गेल्या वर्षीही ‘युएन हवा कृती परिषद २०१८ मध्ये संबोधित केले होते.   

विश्वात सध्या जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग आणि जगातील हवामान बदलाचे मोठे संकट घोंघावत आहे. यावर मात करण्यासाठी व उपाय योजना करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांकडून ‘युएन हवामान कॉती परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर असा या परिषदेचा कालावधी होता. यात अनेक तज्ज्ञ येऊन हवानासंदर्भात आपली मतं मांडतात. यातील एका चर्चेसाठी ग्रेटा थनबर्ग हिला आमंत्रित करण्यात आले होते. 

या परिषदेत बोलताना ग्रेटा म्हणाली, ‘सध्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं जातंय ते अत्यंत चुकीचं असून हे इथेच थांबायला हवं. मी इथे थांबायला नकोय, समुद्रापलीकडच्या शाळेत मी निघून जायला हवंय. तुम्ही आम्हा तरूणांकडे आशेच्या दृष्टीने कसे बघू शकता? जैवसंस्था नाश पावतायत, लोक मरण पावताहेत. विज्ञान गेले २० वर्ष स्पष्ट संदेश देतंय. तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय. हिंमत कशी होते तुमची अशी वागायची. तुमच्या पोकळ आणि खोट्या शब्दांमुळे माझी स्वप्न व बालपण हिरावलं गेलंय…’ असा आरोप तिने जगातील सर्व नेत्यांवर केलाय. 

गेल्या वर्षी उन्हाळ्यात युरोपमध्ये उष्णतेची लाट आली होती; तसेच जंगलाला लागलेल्या वणव्यात ऑगस्ट महिन्यात स्वीडनपासून आर्टिक प्रदेशातील मोठा भूभाग उद्धवस्त झाला. यानंतरच ग्रेटाने चळवळ उभारून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचा दृढनिश्‍चय केला… आता ही तापमानवाढ, हवामान बदल हे सामान्यांचे मुद्दे या चळवळीने जगभर जोर धरायला हवा.
– प्रशांत भाटकर
8424013588

One Reply to “पर्यावरण रक्षणासाठी ग्रेट ग्रेटाची कामगिरी”

Leave a Reply

Your email address will not be published.