fbpx

क्रीडा क्षेत्रातील महिला राज

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय महिला शक्तीचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत भारताच्या महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा डौलाने फडकावला आहे. ज्या देशातील महिला पूर्वी चूल आणि मूल यापलीकडे जाऊ शकत नव्हत्या त्याच देशातील महिलांनी आज क्रीडा क्षेत्रात देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे जात महिलांनी आंतरराष्ट्रीय मैदान गाजवले. सातत्यपूर्ण कामगिरी करीत भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवणाऱ्या ९ महिला खेळाडूंची क्रीडा मंत्रालयाने पद्म या देशातील सर्वात मानाच्या पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे.

यामध्ये मेरि कोम, पी व्ही सिंधू, विनेश फोगट, हरमनप्रीत कौर, राणी रामपाल, सुमा शिरुर, कनिका बत्रा ताशी आणि नुंगशी मलिक या ९ खेळाडूंचा समावेश आहे पद्म पुरस्कारासाठी एकाच वर्षात इतक्‍या मोठ्या प्रमाणात महिला खेळाडूंची शिफारस करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे हे वर्ष महिला खेळाडूंसाठी विशेष आहे.
६ वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरणारी ऑलिम्पिक पदक विजेती महिला बॉक्‍सर मेरी कोम हिची पद्मविभूषण या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या मानाच्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. पी व्ही सिंधू हिने ऑगस्ट महिन्यात बॅडमिंटन चे विश्वविजेतपद पटकावले. याशिवाय ऑलिम्पिक स्पर्धेतही तिने भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. तिची शिफारस पद्मभूषण या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी करण्यात आली. २०१७ सालीच पी व्ही सिंधुचं नाव पद्मभूषण साठी सुचवण्यात आले होते. मात्र अंतिम यादीत तिला स्थान मिळू शकले नाही 2015 साली सिंधुला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मेरी कोम, पी व्ही सिंधू यांच्यासोबतच कुस्तीगीर विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनीषा बत्रा भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमणप्रित कौर हॉकीपटू राणी रामपाल, माजी नेमबाज सुमा शिरुर, गिर्यारोहक असणाऱ्या जुळ्या बहिणी ताशी व नुंगशी मलिक या सात महिला खेळाडूंची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. बॉक्‍सर मेरी कोम यांना यापूर्वी 2013 मध्ये पद्मभूषण व 2006 मध्ये पद्मश्रीने गौरवण्यात आले आहे. आतापर्यंत पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च मानाचा पुरस्कार केवळ तीन पुरुष खेळाडूंना मिळाला आहे त्यात बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद, क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि गिर्यारोहक सर एडमंड हिलेरी यांच्या नावाचा समावेश आहे. पद्मविभूषण हा पुरस्कार यापूर्वी कोणत्याही महिला खेळाडूला मिळालेला नाही म्हणूनच मेरी कोम यांची या पुरस्कारासाठी झालेली शिफारस ऐतिहासिक म्हणावी लागेल. केवळ मेरी कोमच नाही तर शिफारस झालेल्या सर्वच महिला खेळाडू या पद्म पुरस्कारासाठी पात्र आहेत कारण प्रत्येक महिला खेळाडूने आपल्या जिगरबाज खेळाने आंतरराष्ट्रीय मैदान गाजवले आहे या महिला खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पदच आहे.

क्रीडा मंत्रालयाने या ९ खेळाडूंची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करुन त्यांच्या कामगिरीचा यथोचित गौरव केला. आगामी प्रजासत्ताक दिनाआधी अंतिम यादी जाहीर केली जाईल तेंव्हा या यादीतील किती महिला खेळाडूंच्या नावावर अंतिम मोहर उमटेल हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.प्रगत देशांच्या तुलनेत भारतात क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षे अनास्थाच दिसून आली आहे. भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीत खूपच मागे पडतात. हा विचार केला तर भारतीय महिला खूपच अव्वल यशापासून दूर आहेत असेच दिसून येत आहे. भारतीय स्त्री म्हणजे चूल व मूल यामध्ये अडकलेली महिला आहे असाच सर्वसाधारण समज आहे. किंबहुना पुरुषप्रधान संस्कृतीत भारतीय महिला खेळाडू उपेक्षितच राहिल्या आहेत. त्यामुळेच की काय अपेक्षेइतकी उत्तुंग झेप भारतीय महिला खेळांडूंना जागतिक क्रीडा क्षेत्रात घेता आलेली नाही. असे असले तरी काही भारतीय महिलांनी पुरुष खेळाडूंइतकीच, काकणभर जास्त चांगली कामगिरी केली आहे.

भारतासाठी ऑलिम्पिक पदक हे वाळवंटातील मृगजळासारखेच असते याचा भारतीय खेळाडूंना अनेक वेळा प्रत्यय आला आहे. वैयक्तिक खेळात ऑलिम्पिक पदक ही भारतीय खेळाडूंसाठी स्वप्नवत ठरले आहे. ऑलिम्पिक पदकांचे दुर्भिक्ष असलेल्या भारतात करनाम मल्लेश्वरी या महिलेने वेटलिफ्टिंगसारख्या ताकदवान खेळात ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवीत इतिहास घडविला. २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये हे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.
दीपिका पल्लिकल (स्क्वॉश), डोला बॅनर्जी, दीपिकाकुमारी (तिरंदाजी), ज्योर्तिमयी सिकदर, शायनी अब्राहम, एम.डी.वलसम्मा, अश्विनी नचप्पा, कविता राऊत, प्रिजा श्रीधरन, कृष्णा पुनिया (अ‍ॅथलेटिक्स), मिताली राज , झुलान गोस्वामी, अंजुम चोप्रा (क्रिकेट), मधुमिता बिश्त, अपर्णा पोपट (बॅडमिंटन), रश्मी चक्रवर्ती (टेनिस), एस. विजयालक्ष्मी, द्रोणावली हरिका, तानिया सचदेव (बुद्धिबळ) आदी खेळाडूंनी भारतीय पुरुष खेळाडूंसारखेच उल्लेखनीय यश आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविले आहे. हम किसीसे कम नही हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.