fbpx

नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव : भवानी मातेचं मंदिर

आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करण्याचा सण म्हणजेच नवरात्रोत्सव. श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला ! अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर देशभरात नवरात्रोत्सवाला शनिवारी जल्लोषात प्रारंभ होतो. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, रेणुका असे विविध रूपे असलेल्या देवींच्या मूर्तीची ठिकठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली.
देशभरात नवरात्रौत्सवाच्या सणाला सुरुवात होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे.आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे.

घटस्थापना ही अश्विन शुक्ल प्रतिपदा दिवशी केली जाते.या दिवशी घटाची स्थापना केल्यानंतर पुढील नऊ दिवस देवी मातेची मनोभावे पूजा केली जाते. तसेच देवीच्या पूजेदरम्यान काही व्रत विधी, नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.
मुंबईसह उपनगरात नवरात्रोत्सवानिमित्त रोषणाई करण्यात आली आहे.आज पाहायला गेले तर मुंबईत ठिकठिकाणी नवरोत्रोत्सव उत्सहात सुरु आहेत. परंतु दादर-पूर्व नायगाव येथील जुन्या-नव्या बी डी डी चालूच्या गराड्यात वसलेले नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सवाची बातच निराळी आहे. येथील भवानी मातेचं मंदिर भाविकांचे नेहमीच श्रद्धास्थान ठरतंय. या नवरात्रोत्सवाची स्थापना १९४४ साली झाली असून मंडळाचे यंदाचे ७५ वे वर्ष दिमाखात सुरु आहे. भवानी मातेची मूर्ती अतिशय सुंदर व तेजस्वी असून दुसरी उत्सवमूर्ती ही फक्त चंदनाच्या लेपाची आहे व वैशिष्ट्य म्हणजे देवीचे वाजतगाजत मिरवणूक काढून स्थापना केली जाते. मात्र विसर्जन मात्र होत नाही. एका अर्थाने पर्यावरणाच्या संवर्धनाचा मंत्र जोपासला जातो. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या या भवानीमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प.पु.श्री गगनगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली होती.मंडळामार्फत दरवर्षी पंचमीला भवानीमातेच्या सहस्स्तर कुंकुमार्चन केले जाते. अर्थात हे कुंकुमार्चन अभिषेक स्त्रिया महालक्ष्मीला करतात याचे कारण आपल्या पाठी अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी देवीचा वरदहस्त असावा. तसेच येथे सत्यम्बा पूजेचा मनही अनेक जोडप्यानं दिला जातो. नवमीच्या होमाला तर ४०-५० जोडपी बसतात.दसऱ्याच्या दिवशी तर महाप्रसादाचे आयोजन खास महिला मंडळाच्या देखरेखीखाली केले जाते. कोणत्याही राजकीय बॅनर्स, होर्डिंग येथे लावले जात नाही सर्वजण आनंद व उत्सहाने एकत्र येऊन धार्मिक भावनेतून निरपेक्षपणे काम करीत असतात, असे मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताभाऊ दिवेकर सांगतात.

दर श्रवण महिन्यात भवानीमातेच्या मंदिर परिसरात ह. भ. प. रघुनाथबुवा आम्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम करताना बाहेरचे कार्यक्रम न करता स्थानिक रहिवाश्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. मंडळाच्या वतीने दरवर्षी आरोग्य शिबीर, मैदानी स्पर्धा, वेशभूषा, कोळीनृत्य, फुगड्या असेच लहान मुलांपासून मोठया माणसांसाठी कार्यक्रम होतात. यापूर्वी जांभूळपाड्यातील पुरग्रस्थांसाठी व आंध्रातील वादळग्रस्थांसाठी मंडळाच्या वतीने भरीव आर्थिक सहकार्य केले होते. गतवर्षी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीसाठी आर्थिक मदत केली. ओंकार मंडळाच्या सहकार्याने यूपीएसेस्सी व एमपीएसेस्सी साठी शिक्षण वर्ग घेतले जातात.

—- रवींद्र मालुसरे
९३२३११७७०४

Leave a Reply

Your email address will not be published.