fbpx

माटुंग्याची श्रीमरुबाई

सात बेटांच्या मुंबापुरीचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी हे समाज.तीनशे वर्षापूर्वी मुंबईतील सर्व गावे ब्रिटिशांनी ताब्यात घेतली. माटुंगा बेटावर प्रामुख्याने कोळी-आगरी,भंडारी लोक मोठय़ा प्रमाणात राहत होती त्या समाजाची वस्ती होती. जुन्या मुंबईची ‘शीव’ म्हणजे आताचे सायनला खेटून उभे असलेल्या माटुंगा इथल्या परिसरात पूर्वी ताडी काढणे असे व्यवयास करायचे. तसेच भातशेती आणि फुलांच्या वाड्या; तसेच शेजारच्या वडाळ्यात मिठागरे हे येथील स्थानिकांचे उपजीविकेचे साधन होते. याच माटुंग्यात ‘माटुंगा टेकडी’ येथे या गावाचे ग्रामदैवत ‘श्रीमरुबाई’ चे देवस्थान होते. काळाच्या ओघात विकासकामांमध्ये ही टेकडी नाहीशी झाली. या टेकडीच्या जागेवर सध्याचा माटुंगा-किंग्जसर्कलच्या  उड्डाणपुलासमोर जैन मंदिर उभे राहिले आहे.

ब्रिटीशानी १ सप्टेम्बर १८८८ मध्ये ‘बीआयटी’ कायद्याखाली मुंबईच्या विकासासाठी मंदिराची व ग्रामस्थांची जागा ताब्यात घेवून त्यांना सध्याच्या अरोरा सिनेमा येथील नाथालाल पारेख मार्गावर जागा दिली, अशी माहिती ‘मुंबई गैझेट’मध्ये मिळते. सुमारे तीनशे वर्षाहून अधिक काळ पुरातन इतिहास असलेल्या श्रीमरुबाई ग्रामदेवतेचे हे मंदिर १९०४ पासून पारेख मार्गावर स्थानापन्न झाले आहे.

येथेच श्रीमरुबाईचे वास्तव्य असल्याने ग्रामस्थांनी या देवीला आपली ग्रामदेवता म्हणून पुजण्यास सुरुवात केली. त्याकाळी माटुंग्यात नारू, देवी, नायटा या रोगांची लागण पसरली होती. या आजारांनी लोक दगावत होते. लोक देवीला साकडे घालण्यास मंदिरात यायचे. त्यामुळे मरणा-याला तारणारी देवी म्हणून देवीचे नाव मरुबाई असे पडले. यापैकी माटुंगा या गावात एका छोटय़ा जागेवर श्रीमरुबाईच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मंदिरात नवरात्रोत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो. लाल-पिवळा-मळवट भरलेल्या काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्तीवर सोन्याचा चढवलेला मुखवटा असे देवीचे अगदी तेजस्वी रूप येथे पाहायला मिळते. दुर्गा भवानीचे रूप असलेल्या मातेच्या दर्शनासाठी येथे दररोज शेकडो भाविक येतात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी देवीची पालखी काढली जाते. तसेच दर महिन्याच्या पौर्णिमेला देवीची मोठी पूजा व नवचंडी यज्ञ केला जातो.

१९५१ मध्ये ग्रामस्थांनी मंदिराची ट्रस्ट रजिस्टर केली. त्या वेळी काशीनाथ गावंड हे ट्रस्टचे विश्वस्त होते. त्यानंतर १९८७ पासून आतापर्यंत ट्रस्टचे विश्वस्तपद अनिल गावंड यांच्याकडेच आहे. लहानशा धूमटित असलेल्या मंदिराचा १९१२ मध्ये संपूर्णपणे संगमरवरी बांधकाम करण्यात आले. २००० मध्ये कांची कामकोटी पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते कुंभाभिषेक करून मंदिराला सोन्याचा कळस चादाविण्यात आला .नवरात्रोत्सवात मंदिरात २ लाखांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. पंचमीच्या दिवशी महिलांसाठी हळदीकुंकूवाचा कार्यक्रम ठेवला जातो. श्रीमरुबीची तेज:पुंज मूर्ती पाहता क्षणी डोळ्ल्यांचे पारणे फेडणारी आहे. मंदिराचा गाभारा सोने-चांदीने मढविलेला असून दररोजची फुलांची बदलती आरास नयनरम्य आहे. दोन फुटांची ‘दुर्गास्वरूप’ असलेली ही मूर्ती अष्टभुजा असून सिंहावर आरूढ झालेली आहे. स्वयंभू पाषाणाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी मूर्तीच्या अंगावर सुवर्ण कवच बसविले असून मुखवटाही सोन्याचा करण्यात आला आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व पूर्णिमा आणि चैत्र व अशिवन नवरात्र उत्सव येथे थाटात साजरा केला जातो.

श्रीमरुबाई देवीला चैत्र त्रयोदशीला ५१ किलो श्रीखंडाचा अभिषेक व चतुर्दशीला देवीचा नवचंडी होम केला जातो. चैत्र पौर्णिमेला देवीचा पालखी सोहळा असतो. पारंपारिक आगरी-कोळी ब्यांड व ढोल-ताश्यांच्या गजरात श्रीमरुबीची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. कोजागिरी पौर्णिमेला नवचंडी होम आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठातून आणलेला अखंड तेवता महानंदादीप हे ह्या मंदिराचे वैशिष्ठय आहे.

धार्मिक पावित्र्य जपताना मंदिर ट्रस्टने विविध सामाजिक उपक्रमांची जोडही दिली आहे. मंदिरातर्फे आदिशक्ती योग विद्यापीठ चालवले जाते. महापालिका शाळांमधून बालवाड्या ; तसेच सायन रुगणालयात गोरगरीब रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणा कार्यशाळा आयोजित केल्या जातात. नवरात्रौत्सवात दुर्गा पूजक मंडळांची भजने, भक्तिगीतांचा कार्यक्रम वीणावादन, ललितापंचमी, दुर्गाष्टमी , कुमारीपूजन, अष्टमिहावन, विजयादशमी अशी विविध धार्मिक अनुष्ठाने आयोजित केली जातात.

मंदिराचे विशवस्त :- अनिल गावंड, रमेश गावंड, सुकदेव म्हात्रे

सहाय्यक : सिद्धेश रमेश गावंड

– प्रशांत रमाकांत भाटकर, ९८२१५८१८७१

Leave a Reply

Your email address will not be published.