fbpx

स्त्रीशक्ती आणि भारत देशाचा पहिल्या महिला पंतप्रधान ‘इंदिरा गांधी’

स्त्रीशक्ती आणि भारत देशाचा पहिल्या महिला पंतप्रधान ‘इंदिरा गांधी’
— रवींद्र मालुसरे

देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान, बांग्लादेशची उभारणी वा देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा निर्णय, आपल्या धाडसी आचरणाने आणि दूरदृष्टीने एक नवे पर्व लिहिणाऱ्या भारतरत्न इंदिरा गांधी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन…
भारतीय राजकारणातील एक झंझावती “वादळ” …अशा स्त्रीशक्ती आणि भारत देशाचा पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सादर प्रणाम !

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या राजकारणाचा विचार करतांना इंदिरा गांधी यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा विचार केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही अशी निश्चितच परिस्थिती आहे. अनेकांना या जागी पं. नेहरू किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांचा विचार करावा असेही वाटेल; परंतु इंदिरा गांधींच्या वेळेची परीस्थिती आणि त्यांनी ज्या पध्दतीने त्यांनी निर्णय घेतले, त्यांचा दूरगामी परीणाम लक्षात घेता इंदिरा गांधीचा भारताच्या राजकारणावरील प्रभाव निर्णायक होता असे विधान करणे धाडसाचे ठरणार नाही.
स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचा प्रसंग एक परदेशाहून आलेल्या एका पाहुणीने या छोट्या मुलीसाठी सुंदर कपडे आणले होते परंतु आम्ही फक्त खादि वापरतो असे सांगत या छोट्या मुलीच्या आईने परदेशी कपडे घेण्यास साफ नकार दिला. मग ती पाहुनी या मुलीकडे वळली कि तुला खरोखरच नको आहेत का कपडे तर या छोट्या मुलीने देखील नकार दिला मग तया पाहुणीने म्हटले, “तुझी आवडीची बाहुली सुद्धा प्रदेशातून बनवलेली आहे. ती सुद्धा तू वापरतेस की!”
त्या नंतर या मुलीने ती बाहुली जिन्यावर नेउन जाळून टाकली. सुरुवातीच्या काळात “गुंगी गुडिया” अशी ओळख असणारी मुलगी द ओन्ली मॅन इन द कॅबिनेट म्हणून ओळखली जाऊ लागली आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान “इंदिरा गांधी” अशी त्यांची जगभर ओळख १९ नोव्हेंबर १९७७ ला त्यांचा जन्म झाला. इंदिराजी या जवाहरलाल आणि कमला नेहरू यांचे एकमेव आपत्य. आज जे घर जवाहरलाल नेहरू ट्रस्ट वापरते त्या घरात इंदिराजींचे बालपण गेले. त्यावेळी त्याचे नाव आनंदभवन होते. नंतर त्याचे नामांतर स्वराजभवन असे केले गेले. स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढाया, घरी चालणार्या चर्चा यामुळे देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आपसूकच मिळत गेले. पुढे देशासाठी कॉंग्रेसने कितीतरी आंदोलने केली त्यावेळी इंदिराजींनी वानरसेनेची स्थापना केली स्थापनेवेळी त्यांचे वय अवघे ११ होते. या वानरसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. अनेक निदर्शने केली .
जानेवारी १९६६ च्या घटनाक्रमावर नजर टाकली तर दिसून येईल की, नेहरुंच्या मृत्यूला जेमतेम २० महिने होत नाहीत तेवढ्यातच त्यांचे उत्तराधिकारी लाल बहादूर शास्त्रींचे ११ जानेवारी, १९६६ ला अचानक देहावसान झाले. भारत पाकिस्तानचे दुसरे युध्द संपून केवळ साडेतीन महिने झालेले होते, लादल्या गेलेल्या युध्दाचे भीषण परिणाम उग्र होत होते, महागाई आकाशाला भिडली होती, बेकारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. खाद्यान्नाची फार मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. या सर्व आव्हानात्मक बाह्य परिस्थिती बरोबरच सत्ताधारी पक्षांत सत्तास्पर्धा टोकाला पोहोचली होती. मोरारजी देसाई, कामराज, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांत एकमत न होऊ शकल्यामुळे तडजोड म्हणून इंदिराजींनी २४ जानेवारी, १९६६ ला पंतप्रधानपदाची पहिल्यांदा शपथ घेतली.
या पार्श्वभूमीवर त्यांची पुढची वाटचाल खडतर होती.

राजकारणात १९५० पासूनच त्या पं. नेहरुंची सावली म्हणून वावरत होत्या. १९५५ मध्ये कॉग्रेसच्या कार्यकारणीच्या सभासद बनल्या आणि १९६० मध्ये पक्षाध्यक्ष. मात्र १९६६ मध्ये कॉंग्रेसमध्ये दुफळी माजली होती. अनेक जेष्ठ नेते विरोधात असतांना १९६७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान झाले सुमारे ६० जागा पक्षाने गमावल्या.
सरकारची जनकल्याणाची धोरणे यशस्वीपणे राबवण्यासाठी बॆंकांचे राष्ट्रीयकरण करण्याच्या प्रस्ताव ठेवला त्याच्या विरोधात अनेक उद्योग घराणी होती त्यामुळेच इंदिराजींच्याच मंत्रिमंडळातील उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई हे देखील विरोधात होते.मात्र सर्वसामान्य जनमत या प्रस्तावाच्या बाजूने होते. पक्षांतर्गत विरोध डावलून तसेच मोरारजी देसाई यांना बडतर्फ करून १९६९ मध्ये त्यांनी राष्ट्रीयकरणाचा प्रस्ताव पुढे रेटला. त्याच वर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्या विरुध्द वि.वि गिरी यांना निवडून आणतांना आणि राजकीय कौशल्याचा प्रताप पक्षांतर्गत विरोधकांना दाखवला.
मात्र या सर्व घडामोडीत १९७० मध्ये त्यांचे सरकार अल्पमतात आले आणि १९७१ मध्ये नियोजित वेळेच्या एक वर्ष आधी मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या.यावेळी इंदिराजीच्या ‘गरीबी हटावो’ या घोषणेला देशभरातून प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या.
तत्कालीन पूर्व पाकिस्तावर पाकिस्तानी सैन्याने अत्याचार सुरु केले पूर्व पाकिस्तानात मोठा अंतर्गत कलह सूरु झाला याचा परिपाक म्हणून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात दाखल झाले हा निर्वासितांचा लोंढा रोखण्यासाठी अखेर पाकिस्तानाविरुध्द लष्करी कारवाई करण्यात आली तत्कालीन अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी भारताला सज्जड दम देऊन देखील राजकिय मुत्सद्देगिरीची अपूर्व प्रचिती देत पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. ९३,००० पाकिस्तानी सैनिक युध्दकैदी बनले. जगाच्या नकाशावर बांग्लादेशचा उदय झाला. स्वत:च्याच पक्षतील जुने नेते ‘गुंगी गुडिया’ असे जिचे वर्णन करीत होते त्याच इंदिराजींचे राजकीय विरोधकही ‘रणचंडिका दुर्गा’ असे गुणगान करू लागले.
चीनने १९६४ मध्ये आण्विक स्फोटाच्या यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर भारतालाही त्या क्षेत्रात पदार्पण करणे आवश्यक झाले होते. त्यामुळेच १९७४मध्ये राजस्थानच्या वाळवंटात पोखरण येथे ‘स्माईलिंग बुध्द’ अर्थात आण्विक स्फोटाच्या यशस्वी चाचण्या स्वबळावर घेऊन भारताला लष्करी दृष्टीने सामर्थ्यशाली बनवण्यात यशस्वी झाल्यामुळे संरक्षण क्षेत्रात भारत बलवान झाला.


प्रशासकीय सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीकोनातून १९७२ मध्ये इंदिराजींनी मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर यांना राज्यांचा दर्जा दिला. उत्तर पूर्व सिमांत भागाला केंद्र्शासित प्रदेश करून त्याला अरुणाचल प्रदेश हे नांव दिले. १९७५ मध्ये सिक्कीमला भारतात समाविष्ट करण्यात आले. या राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात स्थान देण्याचे आणि उत्तम प्रशासकीय व्यवस्था देण्याचे उद्दिष्ट्य साध्य झाल्याचे भविष्यात दिसून आले. १९६६ मध्ये अकाली दलाची भाषावार प्रांत रचनेची मागणी मान्य करून पंजाबी भाषा बोलणा-यांचा पंजाब, त्यातून हिंदी भाषा बोलणा-यांचा हरयाणा, पहाडी भाषा बोलणा-यासाठी हिमाचल प्रदेश या वेगळ्या राज्यांची निर्मिती केली. १९७५ मध्ये जम्मू काश्मीरला विशेष घटनात्मक दर्जा देऊन तेथील फुटीरवाद नियंत्रणात आणला म्हणूनच त्यांच्या कार्यकालात काश्मीर ब-याच प्रमाणात शांत राहिला.
इंदिरा गांधींच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताला जगात मानाचे स्थान मिळाले.

१९७५ पासून १९८० पर्यंतचा काळ हा इंदिरा गांधींच्या आयुष्यातील खडतर काळ होता. १९७७च्या सार्वत्रिक निवडणुकीत अत्यंत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर ‘इंदिरायुगाचा अस्त’ अशी समजूत करून घेणा-यांना पूर्णत: चुकीचे ठरवत १९८० च्या लोकसभा निवडणुकीत दिमाखदार विजय संपादन करून पुन: पंतप्रधानपद मिळवले. मात्र आता परीस्थिती बदलली होती. खलीस्तानवादी शीख अतिरेक्यांनी देशभरात थैमान घातले होते. यांचा नेता होता जर्नेलसिंग भिद्रानवाले. खरेतर हे भूत इंदिरा गांधींच्याच राजकारणाचे फलीत होते.
१९८३ पासून भिंद्रानवालेच्या याच फुटीरवादी गटाने आपल्या कारवायांच्या खलिस्तान चळवळीचे मुख्य केंद्र शीखांसाठी अत्यंत पवित्र अशा सुवर्ण मंदिरात केले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विध्वंसक शस्रास्त्रांचा साठा केला. येथील कारवाया थांबवण्यासाठी आणि तेथील शस्त्रे हलवण्यासंबंधी अवाहन करुनही खालीस्तांवाद्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर सुवर्णमंदिरावर निर्णायक लष्करी कारवाईसाठी तयार होण्याचे आदेश इंदिरा गांधी यांनी दिले. ही कारवाई त्यावेळी अत्यंत आवश्यक होती. अप्रिय असली तरी इंदिरा गांधी यांनी अत्यंत कणखरपणे पार पाडली. याची मोठी किंमत चारच महिन्यात त्यांना आपल्या प्राणाची आहुती देऊन मोजावी लागली.
इंदिरा गांधीच्या कार्यकाळाचा आतापर्यंत आढावा घेतांना असे सहज लक्षात येईल की याच काळात देशाने ख-या अर्थाने स्थित्यंतर अनुभवले. त्यांनी सूत्रे घेतली तेव्हा भारत स्वतंत्र होऊन दोन दशकांचा काळही उलटला नव्हता. देश उभारणी म्हणजे केवळ कारखाने उभारणे आणि उद्योगांचा विकास असेही नाही. आपण ज्या परीस्थितीत आहोत त्यात सुधारणाकरुन त्यातून बाहेर पडण्याची मानसिकता देशवासियांमध्ये निर्माण करणे हाही देश उभारणीचाच भाग मानला पाहिजे.
अन्नधान्यासाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणारा देश ते अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करणारे राष्ट्र असा प्रवास ही मानसिकता सर्व संबंधीतांमध्ये निर्माण करण्यामुळे झाला. पंतप्रधान या नात्याने त्यांनी तीन पंचवार्षिक योजनांचे नेतृत्व केले. निश्चित केलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे त्यांनी आचरणात आणून दाखवले. आणीबाणीच्या पार्श्भूमीवर आलेली पांचवी पंचावार्षिक योजना वीस कलमी कार्यक्रमामुळे गाजली. या कार्यक्रमावर अतोनात टीका झाली तरी नियोजित लक्ष्य साध्य करण्याचे प्रयत्न या योजनेत सर्वाधिक जोमाने करण्यात आले.
त्यांच्या कारकीर्दीवर न पुसला जाणारा डाग लागला तो जून १९७५ मध्ये स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी घटनात्मक तरतुदींचा गैरवापर करून देशात आणिबाणी जाहीर केली व्यक्तिस्वातंत्राचा अतोनात प्रमाणात संकोच झाला.

त्यानंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाचे भूतो न भवती अशाप्रकारचे नुकसान झाले. त्या स्वत:ही या निवडणूकीत पराभूत झाल्या. ऑपरेशन ब्लू स्टार हे कोणत्याही सत्ताधिशासाठी आव्हान होते. राजकीय दृष्टीने अंगलट येऊ शकणारा निर्णय केवळ देशहितासाठी घेतला आजही शीख समाज त्यासाठी इंदिराजींना माफ करीत नाही त्यांच्यासाठी हा भावनात्मक मुद्दा आहे. पण ज्या प्रमाणात संहारक शस्त्रास्त्रांचा साठा सुवर्ण मंदिरात केले गेला होता आणि त्याचा वापर अतिरेकी कारवायांसाठी केला जात होता. त्यामुळे ही कारवाई आवश्यक बनली होती.
इंदिराजींच्या शेवटच्या भाषणात ३० ऑक्टोबर, १९८४ ला मृत्यूच्या काही तांस आधी त्यांचे शब्द होते, “आज मी जिवंत आहे, कदाचीत उद्या नसेनही, शेवटच्या श्वासापर्यंत मी अखंड देशसेवा करीत राहीन, माझ्या रक्ताचा एक- एक थेंब देशाचे अखंडत्व अबाधित राखण्यासाठी खर्च पडेल” नियतीच जणू त्यांच्या तोंडून बोलत होती ३१ ऑक्टोबर, १९८४च्या सकाळी आपल्या निवासस्थातील बागेत फेरफटका मारत असतांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेत त्यांची हत्या केली.
इंदिराजी लहानपणापासून अगदी मृत्यु पर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मनात एक द्वंद्व घेऊन जगत होत्या. कारण लहानपणी त्यांच्या वाट्याला वडील जास्त आले नाहीत. आईचा मृत्यू, पतीचा आणि वडिलांचा मृत्यू, वैवाहिक जीवनातील अस्वस्थता, राजकीय निर्णय, स्वताच्या इच्छेला घातलेली मुरड. अश्या बर्याच घटनांचा उल्लेख त्यांनी अमेरिकन मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात आणि इतर जवळच्या व्यक्तींकडे केला आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात नेहेरुंच्या समाजवादी/निधर्मी/अलिप्ततावादी वगैरे स्वप्नरंजनापासून पूर्णतः विपरित अशा परस्थितीला इंदिरा गांधींनी यशस्वीपणे-कणखरपणे तोंड दिले व त्यांची राजवट हा एक महत्वपूर्ण कालखंड होता हे कुणालाच अमान्य करता येणार नाही,

Leave a Reply

Your email address will not be published.